पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये ठेवणे; चीन देणार भारताला साथ

Put Pakistan on the Gray List-China to support India

नवी दिल्ली : पाकिस्तानची नेहमी पाठराखण करणारा चीन दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताला साथ देणार आहे. मनी लाँड्रिंग आणि दहशतवादाला आर्थिक रसद पुरवणाऱ्यांविरोधात पाकिस्तानने ठोस कारवाई करावी, यासाठी एफएटीएफ (फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्सकडून) पाकिस्तानला जूनपर्यंतची मुदत देण्यात येणार आहे. याबाबतच्या ठरावाला भारत, अमेरिका आणि युरोपियन देशांच्यासोबत चीन आणि सौदी अरेबियाही पाठिंबा देणार आहेत.

याआधी एफएटीएफमध्ये चीन पाकिस्तानला पाठिंबा देत होता, हे उल्लेखनीय. जूनमध्ये होणाऱ्या एफएटीएफच्या बैठकीआधी पाकिस्तानला त्यांच्या भूमीवरील दहशतवादी संघटना, त्यांच्या म्होरक्यांना दोषी ठरवून शिक्षा सुनवावी लागणार आहे.

आता फक्त टर्की या एका देशाने पाकिस्तानने समर्थन केले आहे. चीनच्या भूमिकेत झालेला बदल अंत्यत महत्वपूर्ण आहे. पाकिस्तान एफएटीएफच्या ‘ग्रे लिस्ट’मध्ये राहणार हे आता निश्चित आहे. पाकिस्तानने जूनपर्यंत दहशतवाद्यांविरोधात ठोस कारवाई केली नाही तर, त्यांला गंभीर परिणाम भोगावे लागतील. यासंबंधीची अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता आहे. एफएटीएफच्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानची धडपड सुरू आहे. ग्रे लिस्टमधल्या देशांना आंतरराष्ट्रीय स्तरावरुन मदत मिळण्याचे मार्ग बंद होतात. सध्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे त्यांना मदतीची आवश्यकता आहे.