पुष्कर जोडणार सासू सुनेचं नातं

pushkar shrotri

सासू-सुनेचं नातं म्हटलं की छत्तीसचा आकडा हे आजपर्यंतचं वर्णन. माप ओलांडून येणारी सून असते पण तिची मापं काढणारी सासू असते असे गमतीने म्हटले जाते. सून उखाण्यात नाव घेऊन घरात येते पण सासू मात्र तिला आयुष्यभर नावं ठेवते असाही विनोदाचा शिडकावा सासू-सुनेच्या नात्यावर केला जातो. मालिका सिनेमा नाटक यामधून देखील सासू-सुनांचं नातं हे वाघ बकरी सारखं दाखवण्यात आले आहे.

पण बदलत्या काळानुसार नक्कीच सासू आणि सून यांच्यात वेगळेच बंध तयार होत आहेत. तरीदेखील काही कुरबुरी असतील तर त्या दिलखुलासपणे ओठावर याव्यात आणि सासू-सुनेच्या नात्यांमधले सगळे मळभ दूर होऊन ते नातं फुलावं हाच उद्देश घेऊन अभिनेता पुष्कर श्रोत्री सून सासू-सून असं म्हणत आता छोट्या पडद्यावर दाखल होणार आहे. अभिनेता निर्माता दिग्दर्शक याबरोबरच निवेदक म्हणून पुष्कर श्रोत्री यशस्वी झाला आहे. याच निवेदनाची कमाल आणि त्याच्यातल्या मिश्किल स्वभावाची धमाल या दोन्ही गोष्टी सून सासू सून या शोच्या माध्यमातून बघायला मिळणार आहेत.

लवकरच हा शो छोट्या पडद्यावर दाखल होत असून सध्या चित्रीकरण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता घेऊन पार पाडले जात आहे. पुष्करने आजपर्यंत अनेक मालिका सिनेमांमध्ये काम केले आहे पण अशा प्रकारच्या निवेदकाच्या रूपाने पुष्कर पहिल्यांदाच त्याच्या चाहत्यांना भेटणार आहे.

विशेष म्हणजे या शोसाठी पुष्कर खूप उत्सुक असून या निमित्ताने वेगवेगळ्या घरातील सासू-सुनाबरोबर संवाद साधायला मिळणार याचा त्याला वेगळाच आनंद आहे. सध्या या शोचे प्रोमो झळकत असून या प्रोमोंमध्ये असंच सांगण्यात आले आहे की सासू-सुनेचं नातं हे केवळ काही गैरसमजातून गढूळ होत असतं ते गैरसमज बोलून दूर केले तर सासू-सुनांचं नातं इतर नात्यासारखंच छान होऊ शकतं.

यापूर्वी भांडा सौख्यभरे हा शो अभिनेता प्रसाद ओक निवेदित करत होता ज्यामध्ये कौटुंबिक समस्या सोडवत असताना सासू आणि सून यांच्यातलं नातं किती मनमोकळे आहे यावर देखील चर्चा झाली होती. या संकल्पनेच्या जवळपास जाणारा हा सून सासू-सून हा शो आहे. यानिमित्ताने एक वेगळा प्रयोग पुष्कर श्रोत्रीला करायला मिळणार आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये विनोदाची उत्तम जाण असलेले आणि कोपरखळ्या आणि शब्दांची गंमत माहीत असणारे मोजके कलाकार आहेत त्यामध्ये पुष्कर आहे. एखादा गंभीर विषय देखील मिश्किलपणे मांडण्याची हातोटी पुष्करकडे असल्यामुळे ऑन स्क्रिन सासु सुनेचे भांडण हे कजाग न वाटता ते गोड भांडण वाटेल यासाठी पुष्करमधला हाच मिश्कीलपणा उपयोगी ठरणार आहे. त्यामुळेच पुष्करच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातील घराघरात सासु सुनेच्या नात्यात नेमकं काय शिजतंय हे पाहणं प्रेक्षकांसाठी रंजक ठरणार आहे.

पुष्कर श्रोत्री हा ‘प्लॅनेट मराठी’ या मराठीत येऊ घातलेल्या पहिल्यावहिल्या ओटीटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. ‘मार्चपासून करोनाच्या कालावधीत एकही मराठी चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. एक कलाकार म्हणून ही बाब मनाला खटकली. त्यामुळे आम्ही ‘प्लॅनेट मराठी’ हे डिजिटल थिएटर सुरू करत असून यावर मराठी चित्रपट प्रदर्शित केले जातील. यासाठी प्रेक्षकांना तिकिटे काढून चित्रपट पाहता येतील. ज्या निर्मात्यांना चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित करायचे नाहीत, ते चित्रपट या डिजिटल थिएटरवर प्रदर्शित करतील. यासाठी तांत्रिक साहाय्याचे काम सुरू असून डिजिटल थिएटर या महिन्याभरात तर ओटीटी प्लॅटफॉर्म मार्चपर्यंत सुरू होणार असल्याचे पुष्कर सांगतो. या दोन जबाबदाऱ्यांबरोबरच सध्या काही वेबमालिका आणि लघुपटाचेही दिग्दर्शन करत असल्याचे त्याने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER