कर्नाटक पोलीस आणि शिवसैनिकांत धक्काबुक्की

shivsena & Karnataka Police

बेळगाव : बेळगावमध्ये महानगरपालिकेच्या समोर भगवा झेंडा फडकावणारच, असा निर्धार करून कोल्हापुरातील शिवसेनेचा मोर्चा महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर शिनोळी गावाजवळ येऊन थडकला आहे.

मात्र, सीमेवर कर्नाटक पोलिसांनी शिवसैनिकांना रोखले. यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये धक्काबुक्की झाली. पोलिसांचा बंदोबस्त झुगारून आम्ही जाणारच, असा आंदोलकांनी पवित्र घेतला आहे. सीमेवर तणावाचे वातावरण असून पोलिसांनी अधिक कुमक मागवली आहे. २८ डिसेंबर रोजी बेळगाव महापालिका कार्यालयासमोर काही कन्नडिगांनी बेकायदा लाल-पिवळा ध्वज फडकावला. त्यामुळे मराठी जनतेत संतापाची लाट उसळली. म. ए. समितीने जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची भेट घेऊन २१ जानेवारीच्या आत बेकायदा लाल-पिवळा ध्वज हटवावा; अन्यथा विराट मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा दिला होता. त्यानुसार शहरात आणि गावोगावी जनजागृती करण्यात आली. त्याला मोठा प्रतिसाद लाभत आहे.

दरम्यान, बेळगाव महापालिकेसमोरील लाल-पिवळा ध्वज हटवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी म. ए. समिती नेत्यांशी चर्चा करण्याची तयारी दर्शवल्यामुळे आणि पोलीस प्रशासनाने चर्चा होईपर्यंत मोर्चा काढू नये, असा दबाव आणल्यामुळे काल, बुधवारी म. ए. समितीने लाल-पिवळ्या ध्वजाविरोधातील मोर्चा स्थगित केला. पण, बेकायदा ध्वज हटवण्याबाबत कायदेशीर निर्णय झाला नाही तर पुन्हा मोर्चाचे रणशिंग फुंकण्यात येईल, असा इशाराही दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER