पूर्वाची होणार दणक्यात एन्ट्री

Purva Shinde

अनेकदा एखाद्या मालिकेमध्ये सुरुवातीपासूनच लोकप्रियता मिळवणाऱ्या कलाकारांबरोबरच एखाद्या कलाकाराने मालिका सोडल्यानंतर त्याच्या जागी रिप्लेसमेंट येणारे कलाकारदेखील तुफान लोकप्रिय होत असतात. ‘लागिर झालं जी’ या मालिकेत किरण ढाणे हिने जयडीची भूमिका सोडल्यानंतर पूर्वा शिंदे हिने जयडीला तिच्या अभिनयाने पुरेपूर न्याय दिला होता. त्यानंतर पूर्वा शिंदे (Purva Shinde) युवा डान्सिंग क्विन या डान्स शोमध्येदेखील दिसली. आता पूर्वाच्या चाहत्यांना लवकरच एक गुड न्यूज मिळणार आहे आणि ‘तुमचं आमचं जमतंय’ या मालिकेत पूर्वाची नव्याने एन्ट्री होणार आहे. राजनंदिनी नावाचे पात्र या नव्या भूमिकेमधून साकारणार आहे. पूर्वा शिंदेला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. अभिनयासोबत तिला डान्सचीही आवड आहे. त्यामुळे अभिनय आणि डान्स यातच करिअर करायचं असं ठरवलं होतं. एकांकिका, नाटक यामधून छोट्या छोट्या भूमिका करत असतानाच ‘लागिरं झालं जी’ या मालिकेमध्ये जयडी म्हणजेच जयश्री हे पात्र साकारण्याची संधी मिळाली.

खरं तर त्यापूर्वी किरण जयडीची भूमिका साकारत होती आणि किरणने ती भूमिका प्रचंड लोकप्रिय केली होती. त्यामुळेच जेव्हा एखाद्या कलाकाराने सोडलेली भूमिका करत असताना जी काही आव्हानं समोर असतात ती पूर्वा शिंदेसमोरही होती. पण तिने ती भूमिका तिच्या अभिनयाने इतकी लोकप्रिय करून दाखवली की खरे तर प्रेक्षक विसरूनच गेले की, जयडीची भूमिका यापूर्वी किरण करत होती. साहजिकच पूर्वाला त्या भूमिकेत प्रेक्षकांनी स्वीकारलं; अर्थात यामागे पूर्वाच्या अभिनयाचा कस होताच. ‘लागिरं झालं जी’ या मालिकेमध्ये पूर्वा जी भूमिका साकारत होती ती नकारात्मक  होती. नायक आणि नायिका यांच्यामध्ये खो घालणारी अशी. मालिका संपल्यानंतर पूर्वाला अजून एक सुखद धक्का मिळाला तो युवा डान्सिंग क्वीन या रियालिटी शोमध्ये सहभागी होण्याचा. यामध्ये ती सेलिब्रिटी डान्सर म्हणून सहभागी झाली आणि तिनेदेखील परीक्षकांच्या आणि प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पूर्वामधील नृत्यकौशल्य तिच्या चाहत्यांना पाहायला मिळालं. त्यानंतर ती नव्या भूमिकेच्या शोधात होती.

गेल्या काही महिन्यांपूर्वीच लॉकडाऊननंतर जेव्हा सिनेमा, मालिकांचे चित्रीकरण यांना परवानगी मिळाली त्यावेळी ‘तुमचं आमचं जमतंय’ ही नवी मालिका छोट्या पडद्यावर दाखल झाली. या मालिकेत पूर्वाची वर्णी लागली आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमधून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर या मालिकेत ‘पम्मी’ ही भूमिका साकारत आहे. तिच्यासोबत पूर्वाला स्क्रीन शेअर करायला मिळणार आहे. पूर्वासांगते, ‘लागीर झालं जी’ या माझ्या पहिल्याच मालिकेमध्ये जयडी नावाची भूमिका मला करायला मिळाली, खरंच खूप मोठी संधी होती. त्या मालिकेमध्ये पूर्ण नकारात्मक भूमिका होती. मात्र आता ‘तुमचं आमचं जमतंय’ यामध्ये अत्यंत सकारात्मक, सोज्वळ, इतरांना समजून घेणारी अशी ही व्यक्तिरेखा आहे. कलाकार म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करायला मिळणं खूप महत्त्वाचं असतं.

माझ्या करिअरच्या पहिल्या दोन मालिकांमध्ये मला दोन वेगवेगळ्या भूमिका करायला मिळाल्या. अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी ही खूप मोठी संधी आहे आणि त्याचा फायदा नक्कीच माझं करिअर घडवण्यामध्ये होईल. राजनंदिनी हे पात्र मालिका सुरू झाल्यानंतर दोन-अडीच महिन्यांनी कथेमध्ये येणार आहे. त्यामुळे नव्याने माझी व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर येणार आहे याचेही भान मला अभिनय करताना ठेवायचे आहे. पहिल्या मालिकेतही सगळे कलाकार प्रेक्षकांच्या सवयीचे झाले होते आणि अशातच माझी एन्ट्री झाली होती. त्यामुळे माझ्यावर एक वेगळ्या प्रकारचे दडपण होते. ‘तुमचं आमचं जमतंय’ या मालिकेतसुद्धा माझी एन्ट्री दोन महिने उशिरा होत असल्यामुळे पुन्हा एकदा मला तोच टास्क करावा लागणार आहे. पण असं काम करताना नेहमीच वेगळ्या प्रकारची मजा येते; शिवाय आपली एन्ट्री कधी होते यापेक्षा कलाकाराचा अभिनय किती सकस आहे यावर आपले स्थान आपण कसे निर्माण करायचे ते अवलंबून असते याची मला जाणीव आहे. युवा डान्सिंग क्वीनच्या मंचावर पूर्वाचा आयब्रो डान्स खूप व्हायरल झाला होता. पण त्यापूर्वीदेखील पूर्वाने एकदा सहज म्हणून तिचा डान्स व्हिडीओ टिक टॉकवर शेअर केला होता. पूर्वा टिक टॉक गर्ल होती.

तिला सतत काही ना काही तरी डान्स स्टेप करायच्या आणि त्या टिक टॉकमध्ये शेअर करायचा छंद होता. त्यामुळे सहज म्हणून एकदा तिने दोन्ही आयब्रोज उडवत डान्स केला होता तो इतका प्रसिद्ध झाला की ती छोट्या पडद्यावर आली नव्हती त्यापूर्वीच टिक टॉक गर्ल म्हणून ओळखली जात होती. प्रत्यक्ष आयुष्यातदेखील ती खूप बबली गर्ल आहे. तिला मजामस्ती करायला प्रचंड आवडतं. प्रोफेशनल डान्स शिकलेली नसली तरी टीव्हीवर बघून ती डान्स करते आणि ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतील तिची भूमिका बघूनच तिला युवा डान्सिंग क्वीनसाठी तिला ऑफर आली होती. अर्थातच नकार देण्याचा प्रश्नच नव्हता; कारण तिला तिच्या आवडीचा डान्स महाराष्ट्र पाहात असलेल्या मंचावर साकारायला मिळणार होता. आता यानंतर एक सोज्वळ, साजूक अशी राजनंदिनी ही व्यक्तिरेखा पूर्वा किती चांगल्या पद्धतीने करते हे पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER