पंजाबमध्ये भाजपला मोठा धक्का; स्थानिक संस्था निवडणुकीत काँग्रेस आघाडीवर

चंदीगड : कृषी कायद्याविरोधात (Farmers Protest) सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा चांगलाच फटका भारतीय जनता पक्षाला (भाजप) (BJP) पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये बसताना दिसत आहे. स्थानिक संस्था निवडणुकीत काँग्रेसने (Congress) मोठा विजय मिळवला आहे. मतमोजणी अद्यापही सुरू असून आतापर्यंत सातपैकी सहा महापालिकांमध्ये काँग्रेसने विजय प्राप्त केला आहे. मोगा, होशियारपूर, कपूरथला, अबोहर, पठाणकोट आणि बठिंडा महापालिकांमध्ये काँग्रेसचा विजय झाला आहे.

बठिंडा पालिकेतील निकाल हा सर्वांत आश्चर्यचकित करणारा असून जवळपास ५३ वर्षांनी काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळाली आहे. बठिंडा लोकसभेचं नेतृत्व शिरोमणी अकाली दलच्या हरसिमरत बादल करत असून नुकतीच कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून त्यांनी मित्रपक्ष भाजपासोबतची युती तोडली आहे. काँग्रेस आमदार आणि राज्याच्या अर्थमंत्री मनप्रीत सिंग बादल बठिंडा विधानसभेचं नेतृत्व करतात. शिरोमणी अकाली दलचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्या त्या चुलतबहीणदेखील आहेत. त्यांच्यासाठी ही पालिका निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती.

शेतकऱ्यांच्या रोषाचे केंद्र ठरलेल्या भाजपला पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये मोठा पराभव पत्करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप खासदार सनी देओल यांच्या गुरदासपूर मतदारसंघातील सर्व २९ जागांवर भाजपचा पराभव झाला असून, या जागांवर काँग्रेसचा विजय झाल्याची माहिती मिळाली आहे. १४ फेब्रुवारीला १०९ नगपालिका, नगर पंचायत आणि सात महापालिका निवडणुकीसाठी मतदान झालं. कृषी कायद्यांवरून आक्रमक आंदोलन सुरू असताना एकूण ७१.३९ टक्के मतदानाची नोंद झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER