पुण्यात साकारणार देशातील पहिली कार्बन न्यूट्रल स्मार्ट सस्टेनेबल टाऊनशिप

- पीएमआरडीए आणि स्वित्झरलँड येणार एकत्र

PMRDA

पुणे (प्रतिनिधी) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि स्वित्झरलँड सरकारने अधिकृत केलेल्या २००० व्हॅट स्मार्ट सिटी असोसिएशन यांच्या वतीने आता पुण्यामध्ये भारतातील पहिली कार्बन न्यूट्रल स्मार्ट सस्टेनेबल टाऊनशिप उभारणार असून यासंदर्भात आज दोघांमध्ये एक सामंजस्य करार करण्यात आला. २००० व्हॅट स्मार्ट सिटी असोसिएशन आणि पीएमआरडीए यांच्या सहकार्यामधून पीएमआरडीएच्या क्षेत्रामध्ये आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य, स्मार्ट, शाश्वत टाऊनशिपाची उभारणी करण्यात येणार आहे.

स्वित्झरलँडचे भारतातील कॉन्सूल जनरल ओथमार हारदेगार, पीएमआरडीएचे आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार, २००० व्हॅट स्मार्ट सिटी असोसिएशन मुख्य कार्यकारी अधिकारी माधव भागवत यांनी सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल जे. डब्लू मेरीएट येथे झालेल्या एका कार्यक्रमात या सामंजस्य करारावर सहया केल्या.

पीएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कविता द्विवेदी, पीएमआरडीएचे मुख्य अभियंते विवेक खरवडकर, २००० व्हॅट स्मार्ट सिटी असोसिएशनचे स्थानिक भागीदार निखील दिक्षीत आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना स्वित्झरलँडचे भारतातील कॉन्सूल जनरल ओथमार हारदेगार म्हणाले की, भारत आणि स्वित्झरलँड या दोन्ही देशांत तब्बल ७१ वर्षांचे मैत्रीपूर्ण सख्य असून शाश्वत विकासासंदर्भात स्वित्झरलँड हा नेहमीच भारताला मदत करण्यासाठी तयार असेल. २००० व्हॅट स्मार्ट सिटी असोसिएशन अंतर्गत कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने भारताने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह्य असून आमच्याकडे असलेले आधुनिक तंत्रज्ञान, अनुभव, या क्षेत्रातील ज्ञान याद्वारे आम्ही भारताला पूर्ण सहकार्य करू.

या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना विक्रम कुमार म्हणाले, “जागतिक स्तरावर भारताला उदयोन्मुख विकास केंद्र बनविण्याच्या दृष्टीने पीएमआरडीए विभागात कार्बन न्यूट्रल असलेली, स्मार्ट, शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य टाऊनशिप विकसित व्हाव्यात या दृष्टीने आम्ही सकारात्मक पाऊले उचलत आहोत. स्वित्झरलँड सरकार यासाठी आम्हाला मदत करीत असून त्याद्वारे सर्व्हिस इंडस्ट्री क्लस्टर, अॅग्रीकल्चर क्लस्टर आणि टुरिझम क्लस्टर अशा संकल्पनेवर एकूण १२ टाऊनशिप उभारण्याचा आमचा मानस आहे. जागतिक तापमानवाढीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीकोनातून करण्यात आलेल्या सीओपी २१ पॅरिस कराराने निश्चित केलेल्या उद्दिष्टांनुसार नियामक आराखड्याचा अवलंब करीत स्वित्झरलँड सरकार या आधीपासून कार्यरत असून त्यांची मदत हे आमच्यासाठी देखील एक महत्त्वाचे पाऊल असेल.”

२००० व्हॅट स्मार्ट सिटी असोसिएशनच्या सहकाराने पीएमआरडीएच्या क्षेत्रात पुढील दिड वर्षांत अशा विविध टाऊनशिप प्रकल्पांच्या अंतर्गत सुमारे १०० कोटी अमेरिकन डॉलर इतकी गुंतवणूक होणे अपेक्षित आहे. याबरोबरच स्थानिकांना शाश्वत विकासाच्या दृष्टीने कार्बन न्यूट्रल असणारी, स्मार्ट टाऊनशिप देण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही प्रयत्नशील असल्याचे यावेळी माधव भागवत यांनी सांगितले.