टाळेबंदी : धरसोड वृत्तीमुळे नागरिकांचे हाल- विनय सहस्रबुद्धे

विनय सहस्त्रबुद्धे

ठाणे : कोरोनाच्या रुग्णांची वाढणारी संख्या आणि टाळेबंदी याबाबत पुणे आणि ठाणे ही दोन शहरे वारंवार चर्चेत येत आहेत. याबाबत टीका करताना भाजपाचे खासदार विनय सहस्रबुद्धे म्हणाले की, या शहरांबाबतच्या प्रशासनाच्या धर-सोड वृत्तीमुळे नागरिकांचे हाल आणि व्यापाऱ्यांचे नुकसान होते आहे.

सध्या राज्यात कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणात पसरते आहे. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी पुन्हा एकदा टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानंतर शुक्रवारी ठाण्यात टाळेबंदीच्या मुदतवाढीचा निर्णय प्रशासनाने घेतला. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पुन्हा एकदा कडक टाळेबंदी लागू करणार असे जाहीर केले आहे. याबाबत मी केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांशी चर्चा केली अशी माहिती विनय सहस्रबुद्धे यांनी दिली.

या संदर्भात त्यांनी ट्विट केले – “ठाणे आणि पुणे शहरातील स्थितीबद्दल केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांच्याशी चर्चा केली. प्रशासनाच्या धरसोड वृत्तीमुळे नागरिकांचे होणारे हाल आणि व्यापाऱ्यांचे नुकसान याची सविस्तर कल्पना त्यांना दिली. संविधानाच्या मर्यादेतच पण केंद्राने अहवाल मागवून कार्यवाही करण्याची विनंती केली.

पुणे, पिंपरी चिंचवड आणि हवेलीमध्ये १३ ते २४ जुलै संपूर्ण टाळेबंदीचा निर्णय घोषित केला आहे. पहिले पाच दिवस या भागात कठोर टाळेबंदी असेल. पहिल्या पाच दिवसांत केवळ दूध वितरण, औषधी दुकाने आणि रुग्णालये सुरू राहातील. वृत्तपत्रांचे वितरणही सुरू राहील, असे प्रशासनाने स्पष्ट केले. ठाणे, कल्याण डोंबिवली शहरांमध्ये १९ जुलैपर्यंत टाळेबंदीची मुदत वाढविण्यात आली. शुक्रवारी रात्री उशिरा मीरा-भाइंदर येथे आणखी नऊ दिवस टाळेबंदीची मुदत वाढविण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER