पुण्याची सूत्रे पवारांच्या हाती; सहा कार्डियाक एम्ब्युलन्स देण्याची घोषणा

Sharad Pawar - Ambulance

पुणे : पुण्यात (Pune) दिवसेंदिवस कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता उभ्या केलेल्या जम्बो कोविड सेंटरमध्ये (COVID Center) केवळ कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने एका युवा पत्रकाराला जीव गमवावा लागला. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात राष्ट्रवादीच्या प्रमुख लोकप्रतिनिधींची बैठक घेत सविस्तर माहिती घेतली. पुण्यामध्ये अशा प्रकारच्या अवघ्या तीनच रुग्णवाहिका असल्याची माहिती बैठकीत मिळाल्यानंतर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच येत्या तीन दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस ट्रस्टच्या माध्यमातून सहा ‘कार्डियाक’ रुग्णवाहिका पालिकेला देण्याचे जाहीर केले.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शरद पवार यांनी पुढाकार घेत स्वतःच सूत्रे हाती घेतली आहेत. पुण्यातील बिघडलेल्या स्थितीला नेमके कोणते घटक जबाबदार आहेत? खरोखरीच परिस्थिती आटोक्यात आणण्यात यश येत आहे का, यावरून पवार यांनी स्थानिक प्रशासनाला फैलावर घेतले. तसेच कालपासून बैठकांचे सत्रही सुरू केले.

जुन्या-नव्या उपायांवर फारशी चर्चा न करता पुण्यात नेमके काय चालले आहे? सध्याच्या परिस्थितीवर कोणाचे नियंत्रण आहे? खरोखरीच परिस्थिती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न होत आहेत का, हे पवार यांनी विचारले. पुणे शहराच्या ५२ लाख लोकसंख्येच्या प्रमाणात केवळ तीनच कार्डियाक एम्ब्युलन्स उपलब्ध होत्या. त्यातील एक बंद आहे. त्याची दखल घेऊन तातडीने सहा कार्डियाक एम्ब्युलन्स देणार असल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले.

बारामती होस्टेल येथे शुक्रवारी झालेल्या बैठकीला राज्यसभेच्या खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शहराध्यक्ष आणि आमदार चेतन तुपे, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, प्रवक्ते अंकुश काकडे, नगरसेवक दत्तात्रय धनकवडे, प्रशांत जगताप उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER