घरबसल्या मिळणार प्रॉपर्टी कार्ड

Property card

पुणे : भूमी अभिलेख विभागाने (Land Records Department) प्रॉपर्टी कार्डही (Property card) ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन करण्याचे काम ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे.

ऑनलाईन प्रॉपर्टी कार्डचे काम सध्या वेगाने सुरू आहे. ते येत्या फेब्रुवारी अखेर पूर्ण होईल असे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना मार्च महिन्यापासून ऑनलाईन प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देण्याचा विभागाचा प्रयत्न असल्याची माहिती जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमिअभिलेखएस चोक्कलिंगम यांनी दिली आहे.

आता प्रॉपर्टी कार्ड (मिळकत पत्रिका) नागरिकांना घरबसल्या मिळणार आहे. डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. फेब्रुवारीअखेर उर्वरित काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यामुळे मार्चपासून नागरिकांना सिटी सर्वे कार्यालयात प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी जाण्याची गरज भासणार नाही.

राज्य शासनाने सातबारा ऑनलाईन केला. डिजिटल स्वाक्षरीचा हा सातबारा नागरिकांना ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आला आहे. आता तर ‘एटीएम’सारख्या मशिनद्वारे सातबारा उतारा नागरिकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. अशी मशिन सेतू कार्यालयात बसविण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला आहे. तो मंजूर झाला तर या मशिनद्वारे नागरिकांना सातबारा उपलब्ध होणार आहे. यामुळे नागरिकांना हवा तेव्हा, हवा तो सातबारा उतारा काढता येणार आहे.

प्रॉपर्टी कार्डच्या नक्कलसाठी नगरभूमापन कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही. घरबसल्या तसेच कुठेही, केव्हाही देय असणारे शुल्क भरले की, ऑनलाईन प्रॉपर्टी कार्ड मिळणार. यामुळे आर्थिक तसेच वेळेची बचत होणार आहे. सुट्ट्या, कार्यालयीन वेळ याचा कोणताही अडसर नाही. हव्या त्या वेळेला ही नक्कल मिळणार आहे. प्रॉपर्टी कार्डची सद्य:स्थिती केव्हाही पाहता येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER