उदयनराजेंचे भाजपासाठीचे योगदान काय? संजय काकडेंची टीका

मुंबई : राज्यसभेच्या जागांसाठी भाजपामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे . भाजपाचे पुण्यातील नेते संजय काकडे यांनी राज्यसभेच्या उमेदवारीवरून उदयनराजे यांच्यावर टीका केली आहे . उदयनराजे भोसले यांचं भाजपासाठीचं योगदान काय, असा प्रश्न काकडेंनी विचारला आहे. मी त्यांच्यापेक्षा पक्ष वाढीला लागावा म्हणून जास्त प्रयत्न केले आहेत, असंही संजय काकडे यांनी म्हटलं आहे. राज्यसभेच्या जागेसाठी भाजपाकडून उदयनराजे यांचं नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे.

त्या पार्श्वभूमीवर संजय काकडे यांनी टीका केली आहे. महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सात खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. त्या जागी वर्णी लागावी म्हणून भाजपामध्ये यावेळी जोरदार चुरस आहे.

महाराष्ट्रातून साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले व विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना राज्यसभेत पाठवणार असल्याचं बोललं जातंय. अमित शहा यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं बोललं जातंय. त्याच पार्श्वभूमीवर संजय काकडे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपली इच्छा बोलून दाखवली.

सुवर्णपदक विजेत्या मुष्टियोद्ध्याची आत्महत्या

 मी यावेळी सहयोगी म्हणून नव्हे तर भाजपाकडून इच्छुक आहे. पुणे महापालिका असेल किंवा विधानसभा निवडणुकीत केलेल्या कामाच्या जोरावर, मेरिटवर मला पक्ष उमेदवारी देईल याची मला १०० टक्के खात्री आहे, असं ते म्हणाले. उदयनराजे यांचं नाव राज्यसभेसाठी निश्चित झाल्याचं निदर्शनास आणलं असता त्यांनी त्याबाबत अनभिज्ञता दर्शवली.

‘उदयनराजे यांना राज्यसभेत पाठवण्याची इतकी घाई पक्ष करेल असं वाटत नाही. उदयनराजे यांचं पक्षात फारसं योगदान नाही. ते राष्ट्रवादी काँग्रेस सोडून पक्षात आले आणि निवडणुकीत पडले. त्यांच्या मतदारसंघात त्यांचे भाऊ वगळता भाजपचा इतर कुणी आमदारही जिंकू शकला नाही. त्यामुळं त्यांना राज्यसभेत पाठवण्याचा निर्णय झाला असेल असं वाटत नाही.’ असं काकडे म्हणाले.