डीएसके ठेवीदाराची आत्महत्या; मुलीच्या लग्नासाठी पैसे मिळे ना!

DSK Investor

पुणे : डी. एस. कुलकर्णी यांच्या डीएसके ठेवीदाराने आत्मह्ताय केल्याचे समोर आले आहे. तानाजी गणपत कोरके (वय-60) असे या ठेवीदाराचे नाव होते. तानाजी कोरके हे पुण्यातील घोरपडी येथील भीमनगर परिसरात राहात होते. गरज पडल्यास केव्हाही आपली रक्कम आपल्याला काढता यावी म्हणून डीएसके मध्ये त्यांनी गुंतवणूक केली होती. मुलीचे लग्न जुडल्यानंतर लेकीच्या लग्नासाठी त्यांना पैसे हवे होते. परंतु, डीएसकेकडे गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्याने त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी आत्महत्येसाठी डीएस कुलकर्णी यांना जबाबदार ठरवलं आहे. चौथ्या मुलीचं लग्न करायचं असून त्यासाठी पैसे मिळत नसल्याने आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी चिठ्ठीत लिहिलं आहे.

शिवसेनेला डिवचण्यासाठी सेनाभवनासमोरच राज ठाकरेंचं भगवं पोस्टर !

तानाजी गणपत कोरके यांना एकूण चार मुली असून दोघींचं लग्न झालं आहे. तानाजी कोरके यांनी मुलींच्या लग्नासाठी गावाकडील मालकीची अडीच एकर जमीन विकली होती. यामधून मिळालेले चार लाख रुपये मुलींच्या लग्नासाठी स्वत:च्या नावे तर मोठ्या मुलींच्या मुलांच्या शिक्षणासाठी ५० हजार रुपये जावई समीर मोरे यांच्या नावे २०१४ मध्ये डीएसके डेव्हलपर्सकडे गुंतवले होते. २०१७ मध्ये पैसे मिळणं अपेक्षित होतं. मात्र वारंवार पाठपुरावा करुनही पैसे मिळाले नाहीत.

तानाजी गणपत कोरके यांनी तिसऱ्या मुलीच्या लग्नासाठी उसने पैसे घेतले होते. मात्र चौथ्या मुलीच्या लग्नासाठी पैसे नसल्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेत असल्याचं त्यांनी चिठ्ठीत लिहिलं आहे. आपल्या आत्महत्येसाठी डीएस कुलकर्णी यांना जबाबदार धरण्यात यावं असंही त्यांनी लिहिलं आहे. चिठ्ठीच्या शेवटी त्यांनी अशी वेळ इतर कोणावरही येऊ नये अशी प्रार्थना मी माझ्या मायबाप सरकारला करत आहे असं म्हटलं आहे. पत्राच्या शेवटी तानाजी कोरके यांनी आपला उल्लेख पुण्यातील सुरुवातीपासूनचा शिवसैनिक असा केला आहे.