कोरोना : प्रत्यक्ष आणि न्यायालयात सादर केलेली आकडेवारी वेगळी, पुण्याच्या महापौरांचा आरोप

Muralidhar Mohol

पुणे : मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay HC) पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत काळजी व्यक्त केली असून पुणे तसंच रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या इतर शहरांमध्ये लॉकडाउन लावण्याची सूचना बुधवारी मुख्यमंत्र्यांना केली. पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) आयुक्त मुंबई पालिकेच्या आयुक्तांशी बोलत का नाहीत? असा प्रश्नही उच्च न्यायालयाने विचारला. ‘मुंबई मॉडेल’ इतर पालिकांनीही स्वीकारले पाहिजेत असा सल्लाही न्यायालयाने दिला. दरम्यान, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी आरोप केला आहे की, प्रत्यक्ष आणि न्यायालयात सादर केलेली आकडेवारी वेगळी आहे.

एका वृत्त वाहिनीशी बोलताना ते म्हणालेत की, वस्तुस्थिती वेगळी असून न्यायालयासमोर कोणी, कशी आकडेवारी दिली याची माहिती घेत आहोत. प्रत्यक्षात आणि न्यायालयात सादर केलेली आकडेवारी वेगळी आहे. म्हणूनच आम्हाला खुलासा करणे भाग पडले.

“न्यायालयात जी माहिती दिली जाते त्याच आधारे न्यायालय आपले म्हणणे मांडत असतं. पण अशी शंका आहे की, ही आकडेवारी नेमकी कधीची आहे. गेले अनेक दिवस राज्य सरकारच्या आकडेवारीत विसंगती पदिसते आहे. पुणे शहरातील स्थिती चांगली आणि नियंत्रणात आहे,” असा दावा महापौरांनी केला.

“पुण्यात गेल्या १५ दिवसांत रुग्णसंख्या १६ हजारांनी कमी झाली आहे, पुण्यात १ लाखांच्या वर अॅक्टिव्ह रुग्ण असल्याचा दावा केला जात आहे. पण पुण्यात सध्या फक्त ३९ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कदाचित त्यामध्ये पुणे शहर, जिल्हा, पिंपरी चिंचवड यांचीही आकडेवारी असावी. पण पुण्यात पॉझिटिव्हिटी, मृत्यूदर, अॅक्टिव्ह रुग्णसंख्या कमी आली आहे,” असे मोहोळ म्हणालेत.

“पुणे शहरात परिस्थिती चांगली असून रुग्णसंख्येचा दर कमी होत आहे. जनजीवन सुरळीत होण्यासाठी चांगले वातावरण आहे. यामुळे नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण होत असून याबाबत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार आहोत,” असे महापौरांनी सांगितले.

“गेल्या एक महिन्यापासून लॉकडाउनसारखी परिस्थिती असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली असून डिस्चार्ज वाढले आहेत. यंत्रणा सुरळीत आहेत. यापेक्षा अधिक लॉक़ाउन काय असणार ? कडक लॉकडाउनची गरज नाही, कारण परिस्थिती नियंत्रणात आहे,” असा दावा त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button