पुणे पदवीधर मतदार संघ : महेश लांडगे यांचा ‘यॉर्कर’; भाजपाला ५७ संघटनांचा पाठिंबा!

Mahesh Landge

पिंपरी चिंचवड : पुणे पदवीधर मतदार संघ निवडणुकीत भाजपाविरुद्ध महाविकास आघाडीमध्ये सामना आहे. अत्यंत चुरशीच्या या लढाईमध्ये भाजपा आमदार महेश लांडगे (Mahesh Landage) यांनी ‘यार्कर’ टाकला. पुणे आणि पिंपरी- चिंचवड परिसरामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तब्बल ५७ संस्था- संघटनांनी भाजपाला लेखी पाठिंबा दिला आहे!

महाराष्ट्रातील राजकारणाच्या दृष्टीने पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. पदवीधर मतदारसंघातून संग्राम देशमुख व शिक्षक मतदारसंघातून जितेंद्र पवार यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे.
पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे आणि चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी उत्कृष्ट नियोजन करून शहरामध्ये सुमारे २७ हजार मतदारांची विक्रमी नोंदणी केली होती.

आमदार लांडगे यांनी महापालिका निवडणुकीप्रमाणे प्रचाराचे सूक्ष्म नियोजन केले. शहरातील विविध शैक्षणिक संस्थाना भेटी दिल्या. पदवीधर मतदार संपर्क अभियान राबवून ‘भाजपा टीम पिंपरी-चिंचवड’ने तगडी मोर्चेबांधणी केली आहे.

आमदार लांडगे यांनी आपल्या ‘स्टाईल’ प्रमाणे महा विकास आघाडीला धक्का दिला. कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रासह विविध जाती-धर्मांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या विविध ५७ संस्था- संघटनांचा पाठिंबा आणि सक्रिय समर्थन मिळवण्यात लांडगे यशस्वी शिष्ठाई केली. या निवडणुकीत पिंपरी-चिंचवड भाजपाचे पारडे जड राहील असा विश्वास भाजपा पदाधिकारी व्यक्त करीत आहेत.

युवा मतदार निर्णायक : आ. निरंजन डावखरे

निवडणूक निरीक्षक आणि आमदार निरंजन डावखरे म्हणाले की, पिंपरी- चिंचवडमध्ये अत्यंत उत्कृष्ट काम सुरू आहे. पक्षाच्या दोन्ही आमदारांनी विक्रमी मतदार नोंदणी केली आहे. या नोंदणीमध्ये युवा मतदार सर्वाधिक आहेत. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढणार आहे. युवा मतदार निर्णायक भूमिका बाजावतील. आमदार लांडगे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुणे जिल्ह्यात आघाडीवर राहू, असा विश्वास आहे. भाजपा उमेदवारांना पाठिंबा दिलेल्या सर्व संस्था- संघटनाचे मी पक्षाच्या वतीने आभार मानतो, अशी प्रतिक्रिया आमदार डावखरे यांनी दिली.

पाठिंबा देणाऱ्या प्रमुख संस्था- संघटना :-

यशवंतराव चव्हाण स्मारक समिती, पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटना, मराठवाडा मित्र मंडळ पिंपरी-चिंचवड शहर, पिंपरी-चिंचवड मुस्लिम महासंघ, मेडिकल असोसिएशन, श्रीक्षेत्र ओरिसा मित्रमंडळ, राजपूत समाज संघटना, विदर्भ मित्र मंडळ, विश्वभारती बंगाली असोसिएशन, सोसायटी फेडरेशन, कोकण विकास मंच, परशुराम सेवा संघ महाराष्ट्र राज्य, कपिलवास्तु बुद्ध विहार समिती, महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक संघटना, शिवगर्जना कामगार संघटना, स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना, अखिल युवा पत्रकार संघ, मावळ असोसिएशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, फॅमिली डॉक्टर असोसिएशनसह एकूण ५७ संस्था- संघटनांनी भाजपाला लेखी समर्थन दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER