पुण्यात कोरोनाचा कहर; अजित पवारांच्या आदेशानंतर चार आयएएस अधिका-यांची नियुक्ती

पुणे : पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. पुण्यातील कोरोना रुग्णाची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर चार नव्या आयएएस अधिका-यांची पुण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.

पुण्यातील करोना रुग्णांची वाढत चाललेली संख्या पाहता. पुण्यात कोरोना रोखण्यासाठी आणि उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे सदस्य सचिव माने, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त पवनीत कौर, कृषि आयुक्त सुहास दिवसे यांची याकामी नियुक्ती झाली. विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान यापूर्वी सहकार आयुक्त, पशुसंवर्धन आयुक्त, साखर आयुक्त, भूजल सर्वेक्षण आणि विकास संचालक यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत टेस्टिंग इन्चार्ज म्हणून आयएएस अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. या चारही अधिकार्‍यांकडे पुणे आणि पिंपरी-चिंचवड मनपा, ग्रामीण आणि कॅन्टोनमेंट हद्दीतील कोरोना नियंत्रणाची जबाबदारी देण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यात काल दिवसभरात 1245 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 29 हजार 844 झाली आहे. जिल्ह्यात काल दिवसभरात 21 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 890 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. उपचारानंतर बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाणही चांगलं आहे. काल दिवसभरात 1066 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण 18 हजार 395 रुग्ण कोरोनामुक्त झाले.

पुणे शहर

पुणे मनपा हद्दीत 861 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले. पुणे मनपा हद्दीतील एकूण रुग्णांचा आकडा 22 हजार 381 वर पोहचला आहे. काल दिवसभरात 15 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत तब्बल 730 कोरोना रुग्ण दगावले आहेत. दिवसभरात 630 रुग्ण डिस्चार्ज करण्यात आले. यासह एकूण कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 13,739 वर पोहचली आहे. सध्या पुण्यात 7912 सक्रिय रुग्ण आहेत. यातील 368 गंभीर असून 64 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. टीव्ही 9 ने ही माहिती दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER