पंच तन्वीर अहमद म्हणतात, माझी चूक झाली!

ब्रेथवेटच्या संतापानंतर दिली कबूली

Toss

ढाका :- क्रिकेट पंच तन्वीर अहमद यांनी आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवीन असल्याचे म्हणत आपली चूक मान्य केली आहे. बांगलादेश आणि वेस्ट इंडिजदरम्यानच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात त्यांच्या नो बॉल देण्याच्या निर्णयांवरुन मोठा वाद उद्भवला होता आणि खेळ आठ मिनिटे थांबला होता.

बांगलादेशचा संघ १९१ धावांचा पाठलाग करत असताना चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेडूवर हे नाट्य घडले होते. त्यात तन्वीर यांनी विंडीज गोलंदाज ओशाने थॉमस याला रेषेच्या पुढून गोलंदाजी केल्यासाठी नो बॉलचा दंड केला होता. मात्र टेलिव्हिजन रिप्लेमध्ये थॉमसच्या पायाचा काही भाग रेषेच्या मागेच असल्याचे स्पष्ट दिसत होते. याच्या आदल्याच चेंडूलाही तन्वीर यांनी नो बॉल जाहीर केले होते तो निर्णयसुध्दा वादग्रस्त ठरला होता. या दोन्ही वेळी मिळालेल्या फ्री हिटवर बांगलादेशी फलंदाजांनी षटकार लगावला होता.

या निर्णयांमुळे विंडीज कर्णधार कार्लोस ब्रेथवेटने संतप्त होत पंचाविरुध्द तक्रार केली होती त्यामुळे खेळ आठ मिनिटे थांबला होता. ब्रेथवेटने चौथे पंच शरिफुदुल्ला आणि रेफरी जेफ क्रो यांच्याशी चर्चासुध्दा केली होती परंतु नो-बॉलचा रिव्ह्यू घेता येत नाही असे त्याला सांगण्यात आले होते.

तन्वीर यांची पंच म्हणून ही पहिलीच आंतरराष्ट्रीय जबाबदारी होती. या गोंधळाबद्दल ते म्हणाले की, नो बोल संदर्भात गोलंदाजाचा पाय आणि रेषा यासंदर्भात नेहमीच वाद असतात. गोलंदाजाने पटकन उडी घेतली तर त्याने पाय नेमका कोठे टेकवला होता याचा निर्णय घेणे अवघड होते. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा असून माझ्याकडून चूक झाली असे त्यांनी मान्य केले आहे.

माझी यापूर्वीची कामगिरी पहाल तर असे कोणतेही प्रश्न नाहीत. ही पहिलीच चूक आहे. इन्शाअल्ला…मी यातून बाहेर पडेल. प्रत्येकाचे चांगले आणि वाईट दिवस असतात. कालचा माझा दिवस खराब होता असे तन्वीर यांनी म्हटले आहे.

वेस्टइंडिजने हा सामना जिंकला परंतु सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत ब्रेथवेटने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले होते की, तो मैदानावरील अशा चूकीच्या निर्णयांविरुध्द आवाज उठवण्यासाठी शिक्षा भोगावी लागली तरी त्यास तयार आहे. याच्या आधीच्या सामन्यातही तन्वीर अहमद व दुसरे पंच गाझी सोहेल यांनी दिलेल्या पायचीतच्या निर्णयांवरही वेस्ट इंडिजने नाराजी व्यक्त केले होते. त्यावेळी चेंडू फलंदाजांच्या बॕटीला स्पर्शून गेलेला होता असे ब्रेथवेटचे म्हणणे होते.

तन्वीर अहमद यांच्या पंचगिरीबाबत २०१६ च्या ढाका प्रिमियर लिगच्या सामन्यातही वाद झाला होता. त्यावेळी आबाहानी लिमिटेड संघाच्या कर्णधारासोबत झालेल्या वादानंतर तन्वीर यांनी मैदान सोडले होते, त्यामुळे तो सामना पुढे ढकलावा लागला होता.