पूनावाला यांचे कार्य महाराष्ट्राचे व देशाचे नाव उंचावणारे, ‘महाराष्ट्र भूषण’ द्या ! – मनसे

Bala Nadgaonkar & Cyrus Poonawaala

मुंबई : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या माध्यमातून या संस्थेचे संस्थापक सायरस पूनावाला (Cyrus Poonawalla) यांनी अनेक रोगांवर लसी  उपलब्ध करून दिल्या आहेत. आता ही संस्था कोविडवरील लसीचं संशोधन करत आहे. सायरस पूनावाला यांचं हे योगदान लक्षात घेऊन त्यांना राज्य सरकारने ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार द्यावा, अशी मागणी मनसेने केली आहे. सायरस पूनावाला हे सीरम इन्स्टिट्युटच्या माध्यमातून गेली अनेक दशके विविध रोगांवर लस उपलब्ध करून देत आहेत.

या महामारीतसुद्धा पूर्ण जगाला त्यांनी लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करून मोठा दिलासा दिला आहे. पूनावाला यांचे कार्य हे महाराष्ट्राचे व देशाचे नाव उंचावणारे असेच आहे. त्यामुळे सायरस पूनावाला यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे ही विनंती, असं ट्विट करत मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी ही मागणी केली आहे.सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही विविध आजारांवरील लस निर्माण करणारी जगातील सर्वांत मोठी कंपनी आहे.

सीरम इन्स्टिट्यूटकडून सध्या पोलिओ, डायरीया, हिपॅटायटस, स्वाईन फ्लू अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती केली जाते. आज जगभरात वेगवेगळ्या आजारांवर ज्या लसींचा उपयोग केला जातो, त्यापैकी ६५ टक्के लस या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होतात. कोरोनावरील लस तयार करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटचा ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी आणि ॲस्ट्रा झेनेका यांच्यासोबत करार झाला आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी कोरोनाची एक लस सरकारला अडीचशे रुपयांना दिली जाईल, असं जाहीर केलं आहे.

तसंच एकूण लसीच्या ९० टक्के लस ही सुरुवातीला भारतीय नागरिकांना दिली जाईल, असंही पूनावाला यांनी स्पष्ट केलं आहे. (Cyrus Poonawalla must be honoured by Maharashtra Bhushan award) दरम्यान, सायरस पूनावाला यांनी पुण्यातील हडपसर भागात १९६६ साली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली. सायरस पूनावाला यांना शर्यतीच्या घोड्यांमध्ये रस होता. घोड्यांच्या रक्ताचा उपयोग अनेक प्रकारच्या लसनिर्मितीसाठी केला जातो. त्यातूनच सायरस पुनावाला यांनी लस निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं आणि तिथून सीरम इन्स्टिट्यूटच्या प्रवासाला सुरुवात झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER