पाणीपुरवठा योजनांच्या पंपांना स्वयंचलित स्टार्टर लावणार

चंद्रपूर : लांब पल्ल्यातील पाणी पुरवठा योजनांच्या अडचणींवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. या पाणी पुरवठा योजनांना सौर ऊर्जेवर आधारित अ‍ॅटोमॅटीक पंप स्टार्टर बसविण्यात येणार असून यासाठी जिल्ह्यातील २५ पाणी पुरवठा योजनांची निवड करण्यात आली आहे. या कामासाठी ५० लाखांच्या निधीला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सुदूर भागात अनेक नळ योजना नदी व नाल्यावर आहेत. नदीकाठावर नळ योजनेची टाकी असताना पंप टाकीपासून लांब अंतरावर असते. पावसाळ्याच्या दिवसांत तसेच इतरही वेळेस पंप सुरू करताना अनेकदा अडचणी येतात. त्यामुळे अनेकदा पाणी पुरवठा प्रभावित होत असते. पंपमध्ये बिघाड आल्यास योजनाच बंद पडून गावाचा पाणी पुरवठा बंद असते. त्यामुळे ही अडचण दूर करण्यासाठी सौर ऊर्जेवर आधारित अ‍ॅटोमॅटीक पंप स्टार्टर बसविण्यात येणार आहे. यामुळे घरबसल्या योजना बंद किंवा चालू करता येणार आहे.

२०१६-१७ या वित्तीय वर्षात जिल्हा देखभाल निधी ५० लाख रूपये प्रस्तावित करण्यात आली. ५ आॅक्टोंबर २०१६ च्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत याबाबत ठराव मंजूर करण्यात आला होता. यासाठी २५ गावांची निवड करण्यात आली असून स्थायी समितीने ५० लाख रूपयाच्या कामास सौर ऊर्जेवर आधारित अ‍ॅटोमॅटीक पंप स्टार्टर बसविण्यासाठी प्रशासकीय मंजुरी प्रदान केली आहे.