लागोपाठ द्विशतकं करणाऱ्या पुकोव्हस्कीने मोडला ब्रॕडमन यांचा विक्रम

Pukovski broke Bradmans record

विल पुकोव्हस्की (Will Pukovski)… आॕस्ट्रेलियातील (Australia) व्हिक्टोरिया (Victoria) संघाच्या या 22 वर्षिय तरुण फलंदाजाचे नाव वारंवार कानी येतंय कारण तो खोऱ्याने धावा करतोय. सातत्याने मोठमोठ्या खेळी करतोय. आॕस्ट्रेलियातील शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत त्याने लागोपाठ दुसऱ्या डावात द्विशतकी खेळी केली आहे.

गेल्या आठवड्यात साउथ आॕस्ट्रेलियाविरुध्द नाबाद 255 धावांची खेळी केल्यावर आता वेस्टर्न आॕस्ट्रेलियाविरुध्द त्याने 202 धावांची खेळी केली आहे. याप्रकारे यंदा 457 धावा केल्यावर तो एकदाच बाद झाला आहे. साउथ आॕस्ट्रेलियाविरुध्द तर त्याने मार्कस हॕरिससोबत 484 धावांची विक्रमी सलामी दिली आहे.

त्याच्याआधी 1997-98 मध्ये टास्मानियाच्या डेन हिल्स याने लागोपाठ दोन द्विशतकं केली होती. शेफिल्ड शिल्ड स्पर्धेच्या इतिहासात केवळ आठच फलंदाजांना लागोपाठ डावात द्विशतकं झळकावता आली आहेत.

यादरम्यान पुकोव्हस्कीने सर डॉन ब्रॕडमन यांचासुध्दा एक विक्रम मागे टाकला आहे. त्यांच्यापेक्षाही कमी डावात त्याने 180 किंवा अधिक धावांच्या चार खेळी केल्या आहेत. सर डॉन ब्रॕडमन यांनी 35 डावात 180 पेक्षा अधिक धावांच्या चार खेळी केल्या आहेत. पुकोव्हस्की याने त्यासाठी 27 च डाव घेतले आहेत. गेल्याच आठवड्यात पुकोव्हस्कीने नाबाद 255 धावांची खेळी करताना साउथ आॕस्ट्रेलियाविरुध्द मार्कस हॕरिससोबत 484 धावांची विक्रामी सलामी दिली होती. याप्रकारे यंदाच्या मोसमात 457 धावा केल्यावर तो पहिल्यांदाच बाद झाला.

आणि यासह त्याने आॕस्ट्रेलियन कसोटी संघात स्थान मिळवण्याचा आपला दावा अधिकच मजबूत केला आहे. त्याला स्थान मिळाले तर भारताविरुध्द तो डेव्हिड वाॕर्नरसोबत आॕस्ट्रेलियन डावाची सुरुवात करू शकतो. त्याला संघात घ्यावेच लागेल असे माजी कर्णधार मायकेल क्लार्कने म्हटले आहे.

वेस्टर्न आॕस्ट्रेलियाविरुध्दच्या या सामन्यात तो दुसऱ्या दिवसअखेर 183 धावांवर नाबाद होता. त्यानंतर आज खेळ सुरु झाल्यावर अर्ध्या तासातच त्याने द्विशतक पूर्ण केले मात्र त्यानंतर लगेचच तो मार्क केलीचा चेंडू फ्लिक करताना झेलबाद झाला. आता गेल्या 21 प्रथम श्रेणी सामन्यात त्याने तीन द्विशतकं केली आहेत.

माजी क्रिकेटपटू ब्रॕड हाॕजने म्हटलेय की, पुकोव्हस्कीसारखा खेळाडू पिढीत एकदाच होतो. तो 100 कसोटी सामनेसुध्दा खेळू शकतो. त्याला आरोग्याची विशेषतः मनस्थितीची समस्या होती पण,आता तो त्यातून बाहेर आलाय. त्यामुळे कसोटी संघातील स्थानाचा तो दावेदार आहे. दीड वर्षापूर्वीही तो संघाच्या उंबरठ्यावर होता. पण त्याच्या वैयक्तिक समस्यांनी त्याची संधी हुकली. त्याचे तंत्र उत्तम आहे आणि तो विलक्षण प्रतिभावान आहे.

माजी कर्णधार किम ह्युजेस व इयान चॕपेल यांनीसुध्दा तो संघातील स्थानाचा दावेदार असल्याचे म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER