
प्रत्येकाचा एखादा दिवस येत असतो. जो कधी अपयशी ठरुन टीकेचा धनी ठरतो तोच पुढे कौतुकास पात्र ठरतो. खेळांच्या दुनियेत बऱ्याचदा असे घडले आहे आणि भारत व आॕस्ट्रेलियादरम्यानची सिडनी (Sydney) कसोटी हे याचे उत्तम उदाहरण आहे. या सामन्यात दोनच दिवसांपूर्वी रिषभ पंत (Rishabh Pant) व चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) हे टीकेचे धनी ठरले होते. रिषभ पंतला अतिशय खराब यष्टीरक्षण व सुटलेल्या झेलांसाठी लोक काय काय बोलले, किती दुषणे दिली अगदी तसेच चेतेश्वर पुजाराबद्दलही झालेय. त्यांच्या पहिल्या डावातील संथ फलंदाजीवर अगदी जोरात आणि चौफेर टीका झाली. आता दोनच दिवसात या दोन्ही खेळाडूंना क्रिकेटप्रेमींनी डोक्यावर घेतले आहे आणि त्याचे कौतुक सुरु आहे. त्यांचे गोडवे गायले जात आहेत कारण सिडनी कसोटीत शेवटच्या दिवशी या दोघांनी आपल्या फलंदाजीने आॕस्ट्रेलियाचे झटपट सामना जिंकण्याचे इरादे हाणून पाडले आहेत आणि सामन्याच्या चौथ्या डावात भारताकडून कुणालाही अपेक्षित नसलेला प्रतिकार बघायला मिळाला.
पुजाराने 77 धावांची खेळी केली आहे आणि रिषभ पंतचे तर शतक फक्त तीन धावांनी हुकले आहे. धावा तर महत्त्वाच्या आहेतच पण या दोघांनी शेवटच्या दिवशी जो वेळ खेळून काढला आणि आॕस्ट्रेलियन गोलंदाजांना थोपवून धरले ते अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळेच भारत जिंकला नाही तरी किमान हा सामना गमावणार तरी नाही याची शाश्वती आली.
पुजारा तर आॕस्ट्रेलियन गोलंदाजांना खेळताना घाबरतो, त्याच्यात इच्छाशक्तीच नाही, त्याच्या संथ खेळीने उलट आॕस्ट्रेलियाचे भले केले अशी टीका झाली होती पण चौथ्या डावात तोच टिकून खेळावा अशी अपेक्षा त्याच्याकडून बाळगली गेली आणि ती त्याने पूर्णसुध्दा केली. शेवटच्या दिवशी जवळपास चहापानापर्यंत तो खेळपट्टीवर पाय रोवुन होता. यादरम्यान 205 चेंडूत त्याने 77 धावासुध्दा नावावर लावल्या. यात 12 चौकार आणि त्यात पॕट कमिन्सला लगावलेले लागोपाठ तीन चौकारही होते.
रिषभ पंतला तर यष्टीरक्षणातील खराब कामगिरीनंतर काय काय बौलले गेले? क्षेत्ररक्षणात त्याने सोडलेल्या झेलांचा विश्वविक्रमही समोर आणला गेला. मुळात पॕट कमीन्सचा चेंडू तिसऱ्या दिवशी कोपरावर लागल्यावर तो खेळू शकेल का याबद्दलच शंका होती कारण तो नंतर आॕस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात यष्टीरक्षणासाठीही मैदानात उतरला नव्हता पण दुखण्यातही तो बॕट घेऊन खेळपट्टीवर उतरला आणि कसोटीत 82 च्या स्ट्राईक रेटने त्याने 97 धावासुध्दा केल्या. त्यात 12 चौकार व तीन षटकार! पुजारासोबत भागिदारी चौथ्या गड्यासाठी 148 धावांची आणि 34 षटके खेळून काढली.
वेदना अशा की ड्रिंक्सच्या वेळी बाटलीचे झाकणही उघडायला त्याला जमत नव्हतं, बदली खेळाडूने त्याची मदत केली पण रिषभने बॕटीशी तडजोड केली नाही. आणखी तीन धावा केल्या असत्या तर कसोटी सामन्यांच्या इतिहासात चौथ्या डावात दोन शतके करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला असता. मुळात सध्याच्या भारतीय संघातील खेळाडूंपैकी केवळ रिषभच्याच नावावर सामन्याच्या चौथ्या डावात शतक आहे. शिवाय चौथ्या डावात 18, 114, 30 आणि 97 धावांच्या खेळीसह भारतीय फलंदाजांमध्ये त्याचीच चौथ्या डावातील सरासरी सर्वाधिक 64.75 आहे. आजसुध्दा पहिल्या सत्रातच त्याने 73 धावा केल्या. आॕस्ट्रेलियात त्याच्या या 73 धावांपेक्षा एका सत्रात अधिक धावा करणारा आणखीन एकच भारतीय फलंदाज आहे आणि आज तोच खेळपट्टीवर त्याचा साथीदार होता. चेतेश्वर पुजाराने गेल्यावेळच्या आॕस्ट्रेलिया दौऱ्यात अॕडिलेड कसोटीत एकाच सत्रात 77 धावा केल्या होत्या.
आता कसोटी सामन्यांच्या चौथ्या डावातील भारतीय यष्टीरक्षकाच्या पहिल्या दोन मोठ्या खेळी रिषभच्याच नावावर आहे. 2018 मध्ये इंग्लंडविरुध्द ओव्हालवर 114धावा केल्यावर त्याने आता 97 धावांची खेळी केली आहे. धोनीने 2007 मध्ये इंग्लंडविरुध्द लाॕर्डस कसोटीत 76 आणि पार्थिव पटेलने 2016-17 च्या मोहाली कसोटीत इंग्लंडविरुध्द 67 धावा केल्या होत्या.
एवढेच नाही तर रिषभ पंत हा आता आॕस्ट्रेलियात सर्वाधिक धावा करणारा (487) यष्टीरक्षक बनला आहे. त्याने सैयद किरमाणी (471) व महेंद्रसिंग धोनी (311) यांना मागे टाकले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला