नाशिक दुर्घटनेच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका

nashik Oxygen Tank leak - Supreme Court - Maharastra Today
  • इस्पितळावर फौजदारी कारवाईचीही मागणी

नवी दिल्ली : नाशिक महानगरपालिकेच्या डॉ. झाकिर हुसैन इस्पितळात ऑक्सिजन घेऊन आलेल्या टँकरमधून गळती होऊन २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या बुधवारच्या हृदयद्रावक घटनेची नि:ष्पक्ष चौकशी व्हावी आणि इस्पितळाच्या व्यवस्थापनावर फौजदारी गुन्हे नोंदवून खटला भरण्यात यावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका लगेच गुरुवारी दाखल झाली.

‘सेव्ह देम इंडिया फौंडेशन’ या मुंबईतील एका स्वयंसेवी संस्थेने ही याचिका केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अध्यक्ष असलेल्या व उच्च न्यायालयाचे दोन निवृत्त न्यायाधीश सदस्य असलेला चौकशी आयोग नेमून या दुर्घटनेची सखोल चौकशी केली जावी. तसेच इस्पितळाच्या अधिकाºयांवर सदोष मनुष्यवध (भदंवि कलम ३०४) आणि निष्काळजीपणाने मृत्यूस कारणीभूत ठरणे (कलम ३०४ ए) हे गुन्हे नोंदवून खटला भरण्यात यावा, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे.

ही दुर्गटना घडली तेव्हा या इस्पितळात १३० कोरोना रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी २४ रुग्णांना नळीव्दारे ऑक्सिजन दिला जात होता. ऑक्सिजनच्या मुख्य टाकीला जोडलेल्या टँकरच्या पाईपमधून वायूची गळती सुरु झाल्याने इस्पितळातील ऑक्सिजनवाहक पाईपलाईनमधील दाब अचानक कमी होऊन रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा बंद झाला. त्याने २४ रुग्ण दगावले होते.

टँकरच्या पाईपचा एक व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने गळती झाली, असे प्राथमिक तपासानंतर सांगण्यात आले. राज्य सरकारने उच्चस्तरिय चौकशीचे आदेश दिले आहे. परंतु याचिकाकर्त्यांचा असा आरोप आहे की, ऑक्सिजन हाताळणार्‍या कर्मचार्‍यांच्या निष्काळजीपणाने ही दुर्घटना घडली.

याचिकेत या मुख्य विषयाखेरीज राज्यातील ऑक्सिजन टंचाई, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा, रुग्णखाटा अपुर्‍या पडणे, आरोग्य यंत्रणेतील कथित अनागोंदी व गैरव्यवहार आणि अत्यावश्यक औषधांचा काळाबाजार हे अनुषंगिक विषयही मांडण्यात आले आहेत.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button