मानसशास्त्रज्ञ ते अभिनेत्री व्हाया ऑडिशन

Aditi Sarangdhar

आपण निवडलेल्या क्षेत्रात काम करणं आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करणे या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. निवडलेलं क्षेत्र असेल त्यात आनंद मिळेलच असं नाही पण आवडीच्या क्षेत्रांमध्ये काम करत असताना मिळणारा आनंद हा वेगळाच असतो याची प्रचिती सेलिब्रेटी कलाकारांचं प्रोफाईल पाहिलं तर नक्कीच त्यांच्या चाहत्यांना येते. मनोरंजन विश्वामध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या डिग्रीवर वेगळच काहीतरी लिहिलेलं आहे किंवा इतकेच नव्हे तर काही वर्ष प्रोफेशन म्हणून वेगळाच व्यवसाय करत होते पण अभिनयाची गोडी लागली आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या डिग्रीला रामराम ठोकला. अभिनेत्री आदिती सारंगधर Aditi Sarangdhar() हीदेखील मानसशास्त्रज्ञ म्हणून काम करत होती पण सहज म्हणून एका मैत्रिणीसोबत ती ऑडिशनला गेली. ऑडिशनमध्ये तिची निवड झाली आणि मग तिचा प्रवास अभिनेत्री म्हणून सुरू झाला. ती ऑडीशन एका छोट्याशा जाहिरातीसाठी होती पण त्यानंतर एका एकांकिकेत तिची वर्णी लागली आणि मग तिने मागे वळून पाहिलेच नाही.

पडद्यावर डॅशिंग भूमिका करण्यात काही अभिनेत्री अगदी तरबेज आहेत यापैकीच आदिती सारंगधरचा चेहरा तिच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना नेहमीच परिचयाचा आहे. ती कणखर व्यक्तिरेखा साकारताना पाहायला मिळाली आहे. आदिती चे अजून एक वैशिष्ट्य सांगायचे तर ती उत्तम धावपटू आहे. शाळा-कॉलेज जीवनामध्ये तिने धावपटू म्हणून मैदानावरही आपलं स्थान कायम पुढेच ठेवलं होतं. शालेय शिक्षण संपल्यानंतर कॉलेजमध्ये असताना तिने मानसशास्त्र हा विषय निवडला.

आदिती सांगते, शाळेत असल्यापासूनच मला आई नेहमी म्हणायची की साधारण घरातल्या वातावरणाचा अंदाज घेऊन मी आज घरात काहीतरी झाले का असं आईला विचारायचे . याचाच अर्थ कुठेतरी माणसांच्या वागण्यातील बदल त्यांच्या चेहर्‍यावरचे हावभाव टिपण्याची मला सवय होती. कॉलेजमध्ये जेव्हा कुठल्या विषयात स्पेशलायझेशन करायचं अशी चर्चा घरात सुरू होती तेव्हा मी मानसशास्त्र हा विषय निवडला होता. शाळेत सुद्धा मला शिक्षकांचं, शिपाई मामांचं निरीक्षण करण्याची आवड होती. कॉलेजमधली मैत्रीण एखाद्या दिवशी नेहमीसारखी वागत, बोलत नसेल तर मला ते लगेच जाणवायचं. तर हे कुठे तरी मुळातच मला आवडीचं वाटत होतं. म्हणून मी मानसशास्त्र हा विषय पदवीसाठी निवडला. त्यानंतरही मी मानसशास्त्रज्ञ म्हणून चाइल्ड सायकॉलॉजीमध्ये अधिक काम केलं. मुलांची मानसिकता समजून घेण्याचा अभ्यास मी केला त्याचा फायदा मला एक आई म्हणूनदेखील झाला. पण एका ऑडिशनने माझं करियर बदलून टाकले, आणि याचा मला खूप अभिमान वाटतो. एक मानसशास्त्र म्हणून मी इतरांच्या मनातले प्रॉब्लेम्स ओळखणं आणि ते सोडवणं याबरोबरच मला माझ्या मनाला काय आवडतंय किंवा माझ्या मनाला कशात आनंद मिळतो हे मला लवकर आणि योग्यवेळी कळालं म्हणूनच मी अभिनय क्षेत्रामध्ये माझी एक जागा निर्माण करू शकले.

आदिती सारंगधर सध्या येऊ कशी कशी मी नांदायला या मालिकेत मालविका खानविलकर ही उद्योगपती मुलीची व्यक्तिरेखा साकारत आहे. यापूर्वी आदितीने लक्ष्य या मालिकेत सुलेखा देशमुख ही भूमिका साकारली होती आणि तिच्या भूमिकेला देखील चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळालं होतं. एकांकिका, प्रायोगिक नाटक , व्यावसायिक नाटकं यामध्येही आदितीने एक काळ गाजवलेला आहे. नाथा पूरे आता या सिनेमात मकरंद अनासपुरे याची नायिका म्हणून काम केलं आणि यानिमित्ताने तिच्या अभिनयात असलेली विनोदाची जाण ही प्रेक्षकांनी पाहिली. ह.म.बने तु. म.बने या मालिकेत तिने साकारलेली विनोदी भूमिका म्हणूनच प्रेक्षकांना आवडून गेली. गेल्या काही दिवसांपासून आदिती ही छोट्या किंवा मोठ्या पडद्यापासून लांब होती.त्या काळात तिने कुटुंबाला वेळ दिला. मुळातच मानसशास्त्र या विषयामध्ये पदवी संपादन केल्यामुळे कधी आपली कुठे जास्त गरज आहे हे ओळखून त्या त्या ठिकाणी आपल्या वेळ देणं हे आधी तिला एक व्यक्ती म्हणून जास्त महत्त्वाचं वाटतं . एक मानसशास्त्र , एक धावपटू आणि एक अभिनेत्री अशा जबाबदाऱ्या पेलत असताना स्वतःचं व्यक्तिमत्त्व आणि स्वतःची ओळख जपत आदितीने तिची अभिनयाची कारकीर्द घडवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER