
भूक लागणे हा इतका स्वाभाविक शरीरवेग आहे की त्याकरीता विशेष लक्ष किंवा विचारही आपण करत नाही. जन्मानंतर भूक ही एकच भावना लगेच बाळाला कळते आणि बाळ रडला की भूक लागली असेल ही जाणीव आईला कळते.
आजकाल नोकरी शिफ्टस् यामुळे भूक लागली का हे जाणण्यापेक्षा लंच टाइम झाला म्हणून जेवणारे कल्चर झाले आहे. आयुर्वेदात आधी खाल्लेले पचल्याशिवाय दुसरे अन्न घेऊ नये असा नियम सांगितला आहे. एकवेळ सकाळचे पचले नसेल तर संध्याकाळी जेवले तर चालेल परंतु रात्रीचे पचले नसेल तर सकाळी लंघनच करावे. आहार पचला का हे कसे जाणावे याकरीता काही लक्षणे सांगितली आहेत.
उद्गारशुद्धि: उत्साह: वेगोत्सर्ग यथोचितः ।
लघुता क्षुप्तिपासा च जीर्णाहारस्य लक्षणम् ॥
खाल्लेले अन्न चांगले पचले असेल तर शुद्ध ढेकर येते म्हणजेच कडू आंबट अन्नाचे वास नसतात. शरीर /पोट हलके जाणवते. मल मूत्र यांचे विसर्जन व्यवस्थित होणे. भूक तहान लागणे.
यावरून लक्षात येईल की एखादेवेळी नाश्ता किंवा दुपारचे जेवण जड झाले की पोट जड वाटते किंवा अन्नाचे ढेकर येतात हे जाणवते अशावेळी पुढचे जेवण घेऊ नये, लंघन करावे, किंवा सूप कढण या सारखा हलका आहार घ्यावा. प्रज्ञापराधाने ( जाणूनबुजून) ; न खायच्या – त्याज्य – हितकर आहार न घेणे या कारणांनी माणसाचे शरीर रोगाचे माहेर घर बनते.
कधी कधी आहाराचे पचनच होत नाही, जाठराग्नि चांगला नसेल तर खोटीच भूक लागते अशावेळी आहार घेतला तर आहार पुष्ट करण्याऐवजी मारक, आरोग्य घातक ठरतो. बद्धकोष्ठता किंवा अतिसार, सुस्ती, निरुत्साह, वायु न सरणे त्यामुळे पोट फुगणे चक्कर अशी विविध लक्षणे निर्माण होतात. यावर वेळेच आहार बदल औषधी चिकित्सा न केल्यास गंभीर आजार निर्माण होतात.
म्हणूनच pseudo hunger, अजीर्ण आहे का याचा विचार करून सुज्ञ माणसाने आहार नियोजन केल्यास स्वास्थ्य टिकविण्याकरीता मदत होते.
ह्या बातम्या पण वाचा :
- हेमंत ऋतुचर्या – थंडीचे दिवस काळजी काय घ्यावी ?
- अश्वगंधा – अश्वप्रमाणे ताकद देणारी वनस्पती!
- कापूर – पूजेमधे असो वा स्वास्थ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा !
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला