कोल्हापुरात एनआरसी आणि सीएए विरोधात महामोर्चा

CAA - NRC Against Protest Kolhapur

कोल्हापूर : राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि नागरिकत्व सुधारणा विधेयक (सीएए) सर्वसामान्य भारतीयांवर लादले जात आहे. त्याच्या निषेधार्थ आज दसरा चौकातून सर्वधर्मियांच्या सहभागाने महामोर्चा काढण्यात आला. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले नागरिकानी हातात तिरंगा झेंडा आणि डोक्यावर भगवा फेटा परिधान करून नागरिकत्व कायद्याच्या विरोधात एल्गार पुकारला. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, महापौर निलोफर आजरेकर, ज्येष्ठ विचारवंत एन. डी. पाटील, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, पुरोगामी विचारवंत गणेश देवी आदींनी दसरा चौकात झालेल्या सभेत मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि नागरिकत्व सुधारणा विधेयक (सीएए) रद्द करा, तसा राज्याच्या विधानसभेत राज्य शासनाने ठराव करावा, काय झालं विरोध करणाऱ्या सोबत केंद्र शासनाने त्वरित चर्चा करावी, आदी ठराव यावेळी महापौर नीलोफर आजरेकर यांनी मांडले त्यास मोर्चेकऱ्यांनी हात वर करून मंजुरी दिली.

भारतीय नागरिकत्वासाठी पाकीस्तान, बांग्लादेश आणि अफगाणीस्तान येथील फक्त ४४०० लोकांची अर्ज केले आहेत. त्यातील किती लोकांची धार्मिक प्रतारणा झाल्याचे सरकार स्पष्ट करु शकलेले नाही. कोल्हापुरातून निघणारा मोर्च राज्याचे प्रतिनिधीत्व करणारा ठरेल. या कायद्याचा त्रास फक्त मुस्लिम बांधवांनाच नाही, तर सर्वच धर्मियांना होणार असल्याचे यावेळी गणेश देवी म्हणाले.

फक्त साडेचार हजार लोकांसाठी संविधान विरोधी भेदभाव करु नये. सरकारने श्रीलंका, नेपाळ, भूतान, चिन, ब्रम्हदेश आदी देशातील लोकांबद्दल या कायद्यात विचार का केलेला नाही? ज्या रहिवाशांकडे १९५१ किंवा १९७१ पूर्वीची कागदपत्रे नसतील ते सर्व घुसपेठी म्हणणे चुकीचे ठरेल. या कायद्याच्या आधारे लोकांमध्ये हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा हेतू असू शकतो, असे एन. डी. पाटील यांनी सांगितले.

यानंतर दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. माहिती संविधान बचाव देश बचाओ कृती समितीच्या सदस्यांनी या मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चेकऱ्यांनी सुमारे पाचशे मीटर लांबीचा आणलेला तिरंगा वैशिष्ट ठरला. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात फलक हातात घेतलेल्या मुस्लिम महिलांचा या मोर्चात मोठा सहभाग होता. मोर्चात सुमारे 30 हजार जण सहभागी झाले असावेत असा पोलिस प्रशासनाचा अंदाज आहे.

मोर्चाच्या तयारीसाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मेळावे घेतले होते. तसेच सीएए आणि एनआरसीबाबत प्रबोधन करणारी ५० हजार पत्रके घरोघरी वाटली. भाजपसोडून सर्वपक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाल्याचा दावा संयोजकांनी यावेळी केला.