सनी लिऑनला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकेपासून संरक्षण

Kerala High Court - Sunny Leone

एर्णाकुलम : अभिनेत्री सनी लिऑन (Sunny Leone) (मूळ नाव करनजित कौर वोहरा), तिचे पती डॅनियल वेबर (Daniel Webber) आणि त्यांचा एक कर्मचारी सुनील राजानी (Sunil Rajani) या तिघांना केरळ उच्च न्यायालयाने (Kerala High Court) एका फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक होण्यापासून गुरुवारी अंतरिम संरक्षण दिले.

सनी लिऑन हिने ३९ लाख रुपये बिदागी घेऊनही ठरल्याप्रमाणे एक मनोरंजनाचा कार्यक्रम केला नाही, अशी फिर्याद के. शियाझ नावाच्या व्यक्तीने नोंदविली आहे. त्यात अटक होण्याची शक्यता लक्षात घेऊन या तिघांनी अटकपूर्व जामिनासाठी केरळ उच्च न्यायालयात अर्ज केले. न्या. अशोक मेनन यांनी पोलीस व फिर्यादी यांना नोटीस जारी केली. पुढील सुनावणी होईपर्यंत या तिघांना अटक करू नये. तपासासाठी त्यांना बोलवायचे असेल तर दंड प्रक्रिया संहितेच्या कलम ४१ ए नुसार त्यांना नोटीस पाठवावी, असेही निर्देश न्यायालयाने दिले.

सनी लिऑनच्यावतीने न्यायालयात असा दावा करण्यात आला की, मुळात पोलिसांनी या फिर्यादीवरून फौजदारी गुन्हा नोंदविणेच चुकीचे आहे. कारण ही फिर्याद ज्यासंबंधी आहे तो पूर्णपणे दिवाणी स्वरूपाचा व्यवहार. उलट फिर्यादीनेच आपली फससवणूक केली, असेही सनी लिऑनचे म्हणणे आहे.

सनी लिऑनने तिच्या याचिकेत म्हटले की, मे २०१८ मध्ये कालिकत येथे एक मनोरंजनाचा कार्यक्रम करण्याच्या संदर्भात आपला फिर्यादीशी करार झाला होता. करार करताना बिदागीची ५० टक्के रक्कम देण्यात आली होती. त्यानंतर फिर्यादीने कार्यक्रम तीन महिने पुढे ढकलण्याची मागणी केली. याला आपण नकार दिला. त्यानंतर आधी दिले आहेत तेवढ्या पैशात कार्यक्रम करावा, असे फिर्यादीने आपल्याला सांगितले. परंतु कार्यक्रम झाल्यावर आयोजक राहिलेले पैसे देतील या आशेने १४ फेब्रुवारी, २०१९ रोजी ‘व्हॅलेंटाईन डे’ला कोचीला जाऊन कार्यक्रम केला. परंतु आयोजकांनी बिदागीची शिल्लक रक्कम दिली नाही.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER