प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेबाबत राज्याने प्रस्तावच दिला नाही – फडणवीसांचा आरोप

Cm Uddhav Thackeray & Devendra Fadnavis

मुंबई : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेबाबत राज्य सरकारकडून प्रस्ताव सादर करण्यात आला नाही. त्यामुळे राज्याच्या विकासाला खीळ बसली असून राज्यातील रोजगाराच्या संधी हिरावल्या गेल्या आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

“प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत निधीचा महाराष्ट्राला फायदा मिळावा, रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारचा पुढाकार, मात्र प्रस्ताव सादर करण्यात राज्याकडून होत असलेला विलंब, यामुळे ग्रामीण भागात रोजगारसंधी निर्माणात होत असलेला विलंब मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांना पत्र.” असे ट्विट करून त्यात फडणवीस यांनी पत्रही सार्वजनिक केले आहे.

पत्रात फडणवीस म्हणाले की – प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा तिसरा टप्पा जाहीर करण्यात आला आहे. यात १.२५ लाख कि.मी. रस्ते बांधण्यात येणार आहेत. महाराष्ट्रासाठी ६५५० कि.मी.चे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. केंद्र याबाबत सतत पाठपुरावा करते आहे; पण राज्याकडून प्रतिसाद देण्यात येत नाही.

इतर राज्यांच्या सुमारे १७ हजार किलोमीटरच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरीही मिळाली आहे. हे रस्ते तयार झाल्यानंतर ग्रामीण बाजार समित्या, शाळा, रुग्णालये संपर्क क्षेत्रात येतील. कोरोनाच्या साथीच्या काळात सर्वत्र रोजगार बुडत असताना रस्त्याच्या या कामांनी हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला असता, असे फडणवीस यांनी लक्षात आणून दिले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER