योग्य रात्रीचर्या – तेवढीच महत्त्वाची !

आयुर्वेदात स्वास्थ्यरक्षण यावर विशेष भर दिला आहे. आता कोरोनामुळे दिनचर्या चांगली असणे किंवा रोग प्रतिकारशक्ति चांगली असणे किती महत्त्वाचे आहे हे सर्वांना लक्षात येत आहे. ज्या व्यक्ती योग्य आहार विहार व्यायाम दिनचर्येचे पालन करतात त्यांना व्याधी क्षमत्त्व चांगले असल्याने स्वास्थ्य टिकवून ठेवण्यास मदत होते. जशी दिनचर्या महत्त्वाची तशीच रात्रीचर्या देखील महत्त्वाची आहे.

संध्या समयी भोजन कधीच करू नये. संध्या म्हणजेच ना दिवस ना रात्र हा संधीकाळ असतो. म्हणून या वेळी आहार, अभ्यास, मैथून या सर्वच गोष्टी वर्ज्य सांगितले आहे.

रात्रीचा आहार हा हलकाच असावा. लवकर जेवण करणे व जड अन्न रात्री न घेणे आरोग्य टिकविण्याकरीता आवश्यक आहे. रात्री दही मुळीच खाऊ नये कारण दही खाल्याने अवरोध निर्माण होऊन पाचन तंत्र बिघडते. तहान नसल्यास उगीच पाणी पिऊ नये. रात्री थंड पाणी पिऊ नये या सामान्य नियमांचे पालन नक्की करावे. रात्री शांत ठिकाणी स्वच्छ जागेवर अंथरूणावर निजावे.

शय्या कशी असावी – अंथरूणावर स्वच्छ चादर घातलेली असावी. योग्य उंचीची उशी असावी. बिछाना लांब रूंद असावा जेणे करून आरामात झोपता येईल. शरीर अकडणार नाही. गादी सरळ व सपाट असावी. उंचसखल गढ्ढा नसावा. गादी नरम व सुखकर असावी. बिछाना गुडघ्यापर्यंत उंच असावा. अशा बिछान्यावर पूर्व किंवा दक्षिण दिशेकडे डोके करून झोपावे. रात्रीच्या सुरवातीला व पहाटे धार्मिक गोष्टींचे स्मरण करावे.

या सर्व गोष्टींचे महत्त्व कशाकरीता तर शांत झोप लागावी. शरीराचा थकवा दूर व्हावा. नवीन दिवसाची सुरवात उत्साहपूर्वक व्हावी. झोप हा आरोग्याचा आधारस्तंभ आहे. शांत गाढ झोप ज्ञानेन्द्रिय मस्तिष्क पाचनसंस्था चांगले ठेवण्याचे कार्य करते. सुखी स्वस्थ आयुष्याकरीता चांगल्या रात्री चर्येचे तेवढेच महत्त्व आहे. रात्री झोपण्याच्या खोलीत मोबाईल टिव्ही नसावा तो बघू नये हे वेगळे सांगण्याची गरज नाही त्याचे अनेक वाईट परीणाम शरीरावर होतात हे सर्वश्रुतच आहे.

Vaidya Sharwari Sandeep Mishal

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER