अखेरच्या सत्रात नफेखोरीचा फटका

- शेअर बाजार घसरला

296th small company stock market

मुंबई : दिवाळीपासून उत्साहात असलेल्या शेअर बाजाराला शुक्रवारी आठवड्याच्या अखेरच्या सत्रात नफेखोरीचा सामना करावा लागला. सकाळी असलेला खरेदीचा जोर दुपारनंतर ओसरला.

दिवाळी दरम्यान मागणी वाढल्याने मंदीच्या वातावरणात बाजारात नवा उत्साह बघायला मिळाला. या उत्साहाला शेअर बाजारानेही दमदार प्रतिसाद दिला. सलग आठ सत्रात सेन्सेक्स ४१ हजारांच्या वेशीवर पोहोचला. तर निफ्टीने १२ हजारांचा टप्पा पार केला. शुक्रवारी मात्र बाजार घसरला. आठ सत्रांच्या वाढलेल्या बाजारात नफेखोरी झाली.

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये शुक्रवारी सकाळी उत्साह होता. निर्देशांक ४० हजार ७४९ च्या उच्चअंकावर पोहोचला. पण दुपारनंतर विक्री सुरू झाली. त्यामुळे सेन्सेक्स ३३० अंकांच्या घसरणीसह ४० हजार ३२३ वर पोहोचला.

दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही सकाळी समतोल व सामान्य खरेदीचा माहोल होता. निर्देशांक १२ हजार ०३४ अंकांच्या पातळीवर गेला. पण विक्रीमुळे दिवसअखेर तब्बल १०३ अंकांच्या घसरणीसह ११ हजार ९०८ वर बंद झाला.