पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसकडून प्रा.जयंत आसगावकर

Jayant Asgaonkar

कोल्हापूर : पुणे (Pune) विभागीय शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसकडून (Congress) सांगरुळ शिक्षण संस्थेचे सचिव प्रा.जयंत आसगावकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. दरम्यान प्रा. आसगावकर यांनी पुणे विभागीय आयुक्त सौरव राव यांच्याकडे मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. जयंत आसगावकर हे श्रीराम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे प्राध्यापक आहेत.

काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील होते. महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री सतेज पाटील यांनी काँग्रेस कमिटीत इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. याप्रसंगी ११ जणांनी मुलाखती दिल्या होत्या. यामध्ये प्रा. जयंत आसगावकर, दादासाहेब लाड, सुजाता माळी चौखंडे, बाबासाहेब पाटील, खंडेराव जगदाळे, तानाजी नाईक, भरत रसाळे, कर्णसिंह सरनोबत, प्रकाश पाटील, भरत रसाळे, जी. के. थोरात यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुणे पदवीधर किंवा शिक्षकपैकी एका मतदारसंघातून काँग्रेसला उमेदवारी मिळावी, त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी आपली अशी ग्वाही पक्षश्रेष्ठींना दिली आहे.

काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या मान्यतेनुसार महासचिव मुकूल वासनिक यांनी मंगळवारी काँग्रेसची उमेदवारी जाहीर केली. त्यामध्ये पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातून प्रा. जयंत आसगावकर व नागपूर पदवीधर मतदारसंघातून अभिजित वंजारी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.आसगावकर यांचा विविध संस्थेशी निकटचा संबंध आहे. संस्थाचालक संघ, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठासह अन्य संस्थेच्या माध्यमातून ते शिक्षण क्षेत्रात सक्रिय आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER