तूर, मूग, उडदाचे उत्पादन घटणार; मराठवाड्यात पेरणी नाही

pune

पुणे (प्रतिनिधी) :- राज्यात पावसाने सरासरी गाठली असली तरी पावसाचे असमान वितरण झाल्याने मराठवाड्यातील तूर, मूग, उडीद आणि खरीप ज्वारी या पिकांच्या पेरण्या सरासरी इतक्याही झालेल्या नाहीत.

पावसाळ्याच्या सुरुवातीला जूनमध्ये पावसाने ओढ दिल्याने कोकणासह, कोल्हापूर आणि पुणे विभागातील भात लागवड सरासरी इतकी झाली नाही.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात सरासरी ९६९.६ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा ताज्या आकडेवारीनुसार तो ९८८.९ मिलिमीटर झाला आहे. राज्यात जून महिन्यात पावसाने ओढ दिली होती. पावसाने जोर पकडण्यास जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडला. पावसाने ओढ दिल्याने भाताची लागवड लांबली. त्यामुळे अतिवृष्टी झालेल्या कोकण, पुणे आणि कोल्हापूर विभागातही भात पेरणीने सरासरी गाठलेली नाही. नाशिक विभागात सरासरीच्या ११६ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

राज्यात सोलापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद आणि परभणीमधे सरासरीच्या ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे. औरंगाबाद, जालना, नांदेड, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यात सरासरीपेक्षा २५ टक्क्या पर्यंत पाऊस कमी झाला आहे.
लातूरमधे खरीप ज्वारीचे सर्वाधिक ३ लाख २९ हजार हेक्टर असून, अवघ्या ७०,९३९ हेक्टरवरील (२१.५३ टक्के) पेरण्या झाल्या आहेत. नाशिक विभागात ज्वारीच्या १,१६, ५७९ हेक्टरपैकी ७८,७९६ हेक्टरवरील (६८ टक्के) आणि औरंगाबाद विभागात २६,४६२ पैकी ८,६७१ हेक्टरवरील (३२.८ टक्के) पेरणी झाली आहे. औरंगाबाद विभागात तूरीच्या १,२८,२११ (८४ टक्के) आणि लातूर विभागात ३,२०,८०६ हेक्टरवर (८३ टक्के) पेरणी झाली आहे. लातूर आणि अमरावतीमधे मूग आणि उडदाच्या पेरणीचा टक्का घसरला आहे. त्यामुळे यंदा खरीप ज्वारी आणि डाळींच्या उत्पादनाचा टक्का मोठ्या प्रमाणावर घसरण्याची दाट शक्यता आहे.

राज्यातील ऊस लागवडीला देखील फटका बसला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातच पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे ऊस लागवडीवर परिणाम झाला. कोल्हापूर आणि सांगली या भागात अतिवृष्टीमुळे ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा दुहेरी फटका उसाला बसला आहे. गेल्या वर्षी या काळात १,८०,३४४ हेक्टरवर ऊस लागवड झाली होती. यंदा १,१५,२८५ हेक्टरवर लागवड झाली आहे. केवळ, मका, कापूस आणि सोयाबीनच्या क्षेत्रात गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढ नोंदविण्यात आली आहे.