प्रियाचे मिशन आकाशकंदिल फत्ते

Priya Marathe

कोरोना नंतर एकूणच आयुष्याला आलेली मरगळ झटकून प्रत्येकजण दिवाळीचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे. सध्या अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या घरी देखील आकाश कंदील तयार होत आहे आणि आकाश कंदील प्रिया मराठे  (Priya Marathe) स्वतः बनवत आहे. तिने आकाशकंदील बनवत असलेला व्हिडिओ तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केला आहे. पारंपारिक डिझाईनचा आकाश कंदील तयार झाल्यानंतर तिने तो गॅलरीत लावला आणि त्याचा आनंद देखील तिच्या चेहऱ्यावर फोटोमधून दिसत आहे.

प्रिया मराठे नेहमीच वेगवेगळ्या कलात्मक गोष्टी करत असते. त्याचे व्हिडिओ देखील ती सातत्याने शेअर करत असते. लॉक डाऊन (Lockdown) च्या काळात देखील तिने अनेक सजावटीच्या वस्तू तयार केल्या आहेत. गेल्याच आठवड्यामध्ये प्रिया मराठीच्या घरी वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत कागद, कार्डशिट, फेव्हीकॉल, सेलोटेप अशी खरेदी झाली. अर्थातच या खरेदी केलेल्या साहित्यामधून हे स्पष्ट दिसत होते की प्रिया मराठेच्या घरी स्वहस्ते आकाश कंदील तयार होणार आहेत. पण आकाश कंदील नेमका कसा असणार याची उत्सुकता तिच्या घरातल्यानाही होती.

प्रिया सांगते, लहानपणापासूनच दिवाळी म्हटले की घरात सजावट आणि आकाश कंदील स्वतः केले जायचे. शाळा कॉलेजमध्ये असताना अशा अनेक गोष्टी मी स्वतः बनवल्या आहे. पण नंतर अभिनयाचे करियर सुरू झाल्यानंतर या सगळ्या गोष्टींना वेळ देणे शक्य होईना. पण कुठेतरी मनात हे नेहमी असायचं की दिवाळीच्या दिवशी आपल्या घरात आपण स्वतः तयार केलेला आकाशकंदील असावा. गेल्या काही वर्षात मी पुन्हा एकदा या आनंदाकडे वळले आणि कितीही काम असले तरी वेळात वेळ काढून आकाश कंदील बनवते. यंदाही दिवाळीसाठी खास स्वतः बनवलेला आकाशकंदिल लावायचं ठरवलं होतं आणि म्हणूनच गेल्याच आठवड्यामध्ये ही सगळी खरेदी करून आले.

वेगवेगळ्या रंगीत कागदांच्या पट्ट्या कापून प्रिया मराठेने मिशन आकाश कंदील पूर्ण केलं. तिने स्वतः बनवलेला आकाशकंदिल तिच्या गच्चीमध्ये लावला आहे. तू तिथे मी, राजा शिवछत्रपती या मालिकांमध्ये प्रिया मराठे दिसली होती. वेगवेगळे सिनेमे, नाटक तसेच हिंदी मालिकांमध्येही प्रिया मराठे चा अभिनय आपण पाहिला आहे. ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे हे प्रिया मराठे चे सासरे आहेत आणि त्यांचा मुलगा शंतनू सोबत प्रियाने लग्न केले आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्रातील वातावरण असलेल्या मोघे यांच्या घरात आल्यानंतरही प्रियाची अभिनय कारकीर्द जोमाने सुरू आहे. प्रिया मराठे जितकी मालिका सिनेमा आणि नाटक या इंडस्ट्रीमध्ये काहीना काही वेगळं करत असते तशीच ती गृहिणी म्हणून देखील वेगवेगळे प्रयोग करत असते. लॉकडाउन काळामध्ये तिने वेगळ्या रेसिपी करत असल्याचे फोटो देखील शेअर केले होते.

यावर्षी मातृदिनाच्या निमित्ताने प्रियाने जी पोस्ट केली होती ती देखील खूप चर्चेत होती. या काळामध्ये घराघरातील स्त्रियांवर कामाचा प्रचंड लोड होता. शूटिंगच्या तारखामुळे घरामध्ये स्वयंपाक करण्याची कितीही इच्छा असली तरी प्रियाला स्वयंपाक घरात डोकावून देखील शक्य नव्हतं परंतु लॉकडाउन काळामध्ये सगळं काम थांबल्याने जवळपास चार महिने तिने स्वयंपाक केला. तिला हे कळून चुकलं की खरंच आपल्या आई किंवा सासुबाई यांच्यासारख्या बायका असतात त्या खरच किती काम करत असतात. प्रियाने या बाबतीत एक आठवण देखील शेअर केली आहे. ती म्हणाली की मी आईला नेहमी म्हणायचे तू हातची नखं का वाढवत नाहीस? नेलपेंट का लावत नाहीस? तेव्हा ती म्हणायची की नाही ग… मला कणिक मळायची करायची असते. मला लसूण सोलायचा असतो. मला तेव्हा कळलं नव्हतं. आता ही कामे मी स्वतः करत होते तेव्हा मला त्या छोट्या-छोट्या गोष्टीत देखील आपली आई किती विचार करत होती. त्या आपल्या आनंदाला कशाप्रकारे मुरड घालतात त्याविषयीची केलेल्या पोस्टला खूप जणांनी प्रतिसाद दिला. असेच काही ना काही वेगळे प्रयोग करत असलेल्या प्रिया मराठेचे हात गेल्या काही दिवसांपासून आकाश कंदील करण्यामध्ये रमले होते. आकाश कंदीलच्या निमित्ताने आपल्या छोट्या छोट्या आवडीला, आपल्या हातामधल्या कलागुणांना तेज द्या असंही तिने आवर्जून सांगितलं. प्रियाच्या आकाश कंदीलला आणि तिच्या उत्साहाला तिच्या चाहत्यांनी देखील दाद दिली आहे. असेच काही ना काही वेगळं करत रहा आणि आम्हाला दाखवत जा अशा प्रतिक्रिया देखील चाहत्यांनी त्यांनी दिली आहे.

ही बातमी पण वाचा : स्मिता तांबेला आठवला तिचा वेडिंग वीक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER