आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणतं सरकार – प्रियंका गांधी

लखनौ : काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी मोदी सरकारवर (Modi Govt) निशाणा साधला आहे. आंदोलन करणाऱ्या लोकांना हे सरकार दहशतवादी म्हणतं, असं म्हणत प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत जीव गमावलेल्या नवरीत सिंग यांच्या मृत्यूनंतर राजकारण चांगलचं तापल आहे. आज प्रियांका गांधी नवरीत सिंग यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी रामपूरला आल्या असता त्या बोलत होत्या.

मोदी सरकारवर निशाणा साधत प्रियंका गांधी म्हणाल्या की, सध्याच्या काळात शहीद लोकांना दहशतवादी म्हटलं जातं. शेतकरी आंदोलन आपल्या विरोधात केलेला कारस्थान वाटतं. सरकार शेतकऱ्यांवर खूप मोठा अन्याय करत आहे. जर कोणताही नेता आपलं म्हणणं ऐकत नसेल, तर तो कोणत्याच कामाचा नाही. आम्हाला अपेक्षा होती की, शेतकऱ्यांसाठी या सरकारचे दरवाजे उघडतील आणि सुनावणी होईल. पण असं काहीच झालं नाही. जर एखादा नेता गरीबांचा आवाज ऐकू शकत नसेल, तर तो आमचा नेता नाही आहे.

कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार करत प्रियंका गांधी म्हणाल्या की, शेतकऱ्यांचं आंदोलन सत्याच्या मार्गाने सुरु असलेलं आंदोलन आहे. हे देशाच्या सर्व शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. हे आंदोलन देशवासियांचं आहे. देशातील सर्व लोकांचं आहे. हे आंदोलन कोणत्याही राजकीय हेतून करण्यात आलेलं नाही.

दरम्यान, प्रियांका गांधीच्या ताफ्यात अपघात झाल्याची घटना घडली. उत्तर प्रदेशातील हापूड रोडवर ही घटना घडली. प्रियांका गांधींच्या ताफ्यातील चार गाड्या एकमेकांना धडकल्या. मात्र या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही. माहितीनुसार ताफ्यातील पुढच्या गाडीचालकाने अचानक ब्रेक लावला, त्यामुळं मागील गाड्या एकमेकांवर आदळल्या. ही घटना प्रियांका गांधी रामपूरला ट्रॅक्टर रॅलीत मृत्यू झालेल्या नवरीत सिंहच्या परिवाराला भेटण्यासाठी जात असताना घडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER