प्रिया रमाणी यांची मानहानी प्रकरणातून सुटका; एम. जे. अकबर यांचा मानहानीचा दावा फेटाळला

Priya Ramani - M J Akbar

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर (M J Akbar) यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यातून पत्रकार प्रिया रमाणी यांची मुक्तता करण्यात आली आहे. दिल्ली न्यायालयाने अकबर यांनी प्रिया रमाणी (Priya Ramani) यांच्या विरोधात केलेल्या मानहानीच्या दाव्यावर निकाल जाहीर केला आहे.

२०१८ मध्ये सुरू झालेल्या #MeToo मोहिमेदरम्यान प्रिया रमाणी यांनी एम.जे. अकबर यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर एम.जे. अकबर यांनी प्रिया रमाणी यांच्या विरोधात मानहानीचा दावा केला होता. अकबर यांना १७ ऑक्टोबर २०१८ मध्ये केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. अतिरिक्त मुख्य महानगरीय दंडाधिकारी रवींद्र कुमार पांडे यांनी हा निकाल दिला.

प्रिया रमाणी यांनी २० वर्षांनंतर प्रतिष्ठा घालवली असल्याचा दावा माजी मंत्री अकबर यांनी कोर्टात केला होता. रमाणी यांचे लैंगिक शोषण झाले होते, तर त्या इतकी वर्षे गप्प का राहिल्या? आरोप केल्यानंतर त्यांनी एकही पुरावा सादर केलेला नाही. त्यांच्याशी कधी गैरवर्तन झाले? कुठे झाले? याचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे प्रिया रमाणी यांना शिक्षा द्यावी, अशी मागणी एम. जे. अकबर यांनी केली आहे.

प्रिया रमाणी यांची भूमिका
प्रिया रमाणी यांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की, अकबर यांची प्रतिमा चांगली नाही. इतर महिलांनीदेखील त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. बंद खोलीत झालेल्या घटनांचा कोणीही साक्षीदार नसतो. अकबर यांची याचिका फेटाळून लावावी, अशी मागणी प्रिया रमाणी यांनी केली आहे.

दिल्ली न्यायालयाने यावेळी ‘राईट ऑफ डिग्निटी गमावून राईट ऑफ रेप्युटेशनचे संरक्षण करता येणार नाही’ असे न्यायालयाने निकालात म्हटले आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे ट्विटवर नेटकऱ्यांनी स्वागत केले आहे. भारतातील महिलांसाठी ऐतिहासिक दिवस आहे, असेही म्हटले गेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER