सीएए, एनपीआरला पाठिंबा देऊ नका; पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव यांना सल्ला

Prithviraj Chavan-Uddhav Thackeray

सीएए (नागरिकत्व संशोधन कायदा) हा अतिशय गुंतागुंतीचा विषय आहे. उद्धव ठाकरे यांनी हा कायदा आधी व्यवस्थित समजून घ्यावा व एनपीआर (राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी) आणि सीएएला जाहीर पाठिंबा देणे टाळावे, असा सल्ला माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव यांना दिला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण इतरही विषयांवर बोलले.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, महाराष्ट्रात शिवसेनेच्या सरकारला पाठिंबा देण्यासाठी सोनिया गांधी यांना राजी करण्यात पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. एनपीआर (राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी) संपुआ सरकारच्या काळातही होत होती. मग तिला आता विरोध का, या प्रश्नाच्या उत्तरात चव्हाण म्हणाले की, २०१९ चा सीएए वादग्रस्त आहे. २००३ ला अटलबिहारी सरकारने सीएए पारित केल्यानंतर एनपीआर आणि एनआरसी अस्तित्वात आले आहेत. एनपीआर (राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी) लीप इयरमध्ये करण्यात येते. ही निवासींची नोंदणी आहे.

नागरिकांची नाही. निर्धारित काळापासून देशात राहणाऱ्यांची यात नोंद होते. ‘निवासी’ या शब्दाची संयुक्त राष्ट्र संघाने अशीच व्याख्या केली आहे. अशी नोंदणी योजनांच्या आर्थिक नियोजनासाठी करण्यात येते. २०१० ला लोकसंख्येसोबत अशी नोंदणी करण्यात आली होती. यात मुसलमानांना वेगळे पाडावे हा आमच्या सरकारचा उद्देश नव्हता. खरी बदमाशी २०१९ च्या सीएएमध्ये आहे.

भारताच्या शेजारी आठ देश आहेत. पण या कायद्यात फक्त तीन देशांचा (अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश) उल्लेख आहे. यात श्रीलंकेतील तामीळ, भूतानमधील हिंदू, मुसलमान, रोहिंग्या आणि छळ होणाऱ्या ख्रिश्चनांचा उल्लेख का नाही? सर्व हिंदू – मुसलमानांना वेगळे करण्यासाठी सुनियोजित आहे. भाजपाचे काही नेतेही यामुळे अस्वस्थ आहेत. आता मुसलमान देशाच्या मुख्य धारेत आले आहेत. त्यांनी तिरंगा हातात घेतला आहे. महिलाही रस्त्यावर उतरल्या आहेत.

उद्या दलितांनाही याची जाणीव होईल. आज सगळ्यांच्या मनात भीती आहे. सीएए आणि कलम ३७० रद्द करणे या वादातून आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदींची विश्वसनीयता कमी झाली आहे. अमित शहा आंतरराष्ट्रीय विश्वसनीयतेची तमा बाळगत नाहीत; पण मोदींचे तसे नाही. मोदी त्यांची आंतरराष्ट्रीय विश्वसनीयता पुन्हा कमावण्याचा प्रयत्न करत आहेत; पण या मुद्यांवर त्यांना यश मिळणे शक्य नाही, असे चव्हाण म्हणाले.

एनपीआर केल्यास तुम्ही एनआरसी थांबवू शकत नाही; काँग्रेस नेत्याचा मुख्यमंत्र्यांना सल्ला