डावाची सुरुवात चौकारांच्या षटकाराने करणारा पृथ्वी शॉ पहिलाच

Sport news-Maharashtra Today

यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL). ज्या एका खेळाडूच्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले असेल तो खेळाडू म्हणजे दिल्ली कॕपिटल्सचा (DC) पृथ्वी शॉ (Prithvi Shaw). साधारण सहा महिन्यांपूर्वीच आॕस्ट्रेलिया दौऱ्यावेळी त्याचे अपयश हा चर्चेचा विषय होता आणि आता त्याने घेतलेल्या भरारीची चर्चा आहे. गेल्या 10 डावात त्याने 185*, 165, 73, 72, 2, 32, 7, 53, 21 आणि आता गुरुवारी 41 चेंडूतच 82 धावांची खेळी केली आहे. यातील पहिल्या तीन खेळी सैयद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील असून नंतरच्या खेळी आयपीएलमधील आहेत.

यादरम्यान अहमदाबाद येथे गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुध्द 82 धावांची खेळी करताना त्याने अक्षरशः वादळी सुरूवात केली. दिल्लीच्या डावातील पहिल्या सहा चेंडूवर त्याने ओळीने सहा चौकार लगावले आणि आयपीएलच्या इतिहासात षटकातील प्रत्येक चेंडूला चौकार लगावणारा अजिंक्य रहाणेसह केवळ दुसराच फलंदाज ठरला. मात्र डावाच्या सुरुवातीलाच सलग सहा चौकार लगावण्याचा पराक्रम त्याचा एकट्याचा आहे.

अजिंक्य रहाणेने 2012 मध्ये राजस्थान राॕयल्ससाठी बंगलोरविरुध्द एस. अरविंदच्या गोलंदाजीवर सलग सहा चौकार लगावले होते.

पृथ्विने गुरुवारी सुरुवात उंचावरुन स्ट्रेट ड्राईव्हच्या चौकाराने केली. पुढचा चेंडू तसाच त्याने गोलंदाजाच्या डोक्यावरुन सीमापार केला. मिडविकेटवरील चौकाराने हॕट्ट्रीक पूर्ण केली. कव्हर्सकडून चौथा चेंडू सीमापार झाला, बॕकवर्ड पाॕईंटकडून पाचवा चौकार आणि सहा चेंडूत सहा चौकाराचा पराक्रम एक्स्ट्रा कव्हरकडून गेलेल्या ड्राईव्हने पूर्ण केला.

सहा चेंडूत सहा चौकार हा पराक्रम नवा नसला तरी डावातील अगदी पहिल्याच सहा चेंडूवर सहा चौकार हे पृथ्वीचे वैशिष्ट्य ठरले. नजर स्थिरावली आणि फलंदाज सेट झाला की फटकेबाजी करु लागतो हा समज त्याने खोटा ठरवला. या खेळीबद्दल नंतर पृथ्वीने सांगितले की, खरे सांगायचे तर मी असा काहीच विचार केलेला नव्हता. मी फक्त कमजोर चेंडू बघत होतो. शिवमसोबत मी चार-पाच वर्षे खेळलेलो असल्याने तो कशी गोलंदाजी करेल, कुठे चेंडू टाकेल हे मला माहित होते. पहिले चार पाच चेंडू हाफ व्हाॕली होते, मी आखूड टप्प्याच्या चेंडूच्या तयारीत होतो.

गेल्या वर्षभरातील चढउतारांबद्दल तो म्हणाला की, माझे वडील भक्कमपणे माझ्या पाठिशी उभे राहिले. आॕस्ट्रेलियातून परतल्यावर मी स्वतः वरच नाराज होतो. पण वडीलांना मला माझा नैसर्गिक खेळ जसा आहे तसे खेळायला सांगितले. त्यांच्या या शब्दांनी मला उमेद दिली आणि मी मेहनत घेतली. क्रिकेटमध्ये चढउतार येतच असतात पण माझ्या वाट्याला उतार जरा जास्तच आले आहेत.

पृथ्वीच्या या पराक्रमाने यंदाच्या आयपीएलला विशेष ठरवले ते यासाठी की, यंदा आयपीएलच्या सामन्यात पहिल्या षटकात आणि शेवटच्या षटकात या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक धावा निघाल्या. चेन्नईच्या रविंद्र जडेजाने बंगलोरविरुध्द शेवटच्या षटकात 37 धावा वसूल केल्या होत्या तर आता पृथ्वीने पहिल्याच षटकात 24 धावा वसूल केल्या आहेत.

आयपीएलमध्ये याच्याआधी एका षटकात नऊ फलंदाजांनी पाच चौकार लगावले होते पण सहा षटकार लगावणारा पृथ्वी हा पहिलाच तर आयपीएल सामन्याच्या पहिल्याच षटकात पृथ्वीच्या 24 धावांआधी निघालेल्या सर्वाधिक धावा होत्या 21 ज्या प्रज्ञान ओझा (2009) व सुनील नारायण (2018) यांनी केलेल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button