माणगाववाडीतील अवैद्य हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर छापा

कोल्हापूर :-  हातकणंगले तालुक्यातील माणगाववाडी परिसरातील अवैद्य हातभटटी दारू निर्मिती केंद्रावर राज्य उत्पादन शुल्क विभाग, स्थानिक गन्हा अन्वेषण विभाग आणि जयसिंगपूर व हातकणंगले पोलीसांच्यावतीने केलेल्या कारवाईत 5 गुन्हे नोंदविण्यात आले. 1 लाख 2 हजार 970 रुपये किंमतीचा साठा केलेला अवैद्य मुद्देमाल नष्ट करण्यात आला, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक गणेश पाटील यांनी दिली.

राज्य उत्पादन शुल्क विभाग, स्थानिक गन्हा अन्वेषण विभाग आणि जयसिंगपूर व हातकणंगले पोलीसांच्यावतीने आज माणगाववाडी परिसरात केलेल्या कारवाईत 5 गुन्हे नोंदविण्यात आले. मोठ्या प्रमाणात हातभटटीसाठी लागणारे कच्चे रसायन, नवसागर, तयार दारू, गुळ इ. मुद्देमाल नाश करण्यात आला. दाखल केलेल्या गुन्हयांमध्ये 3050 लिटर कच्चे रसायन, 50 लिटर गावठी हातभटटी तयार दारू असा 1 लाख 2 हजार 970 रुपये किंमतीचा साठा केलेला अवैद्य मुद्देमाल नाश करण्यात आला असून या कारवाईत आरोपी अनिल खोत यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या कारवाई वेळी पथकातील कर्मचाऱ्यांकडून परिसरात शोध मोहीम राबवली असता आसपास मोठया प्रमाणात लोखंडी बॅरेल, सिंटेक्स टाक्या पत्र्याचे डबे यामध्ये रसायनाचा साठा केलेला आढळला. राज्य उत्पादन शुल्क विभाग, स्थानिक गन्हा अन्वेषण विभाग आणि जयसिंगपूर व हातकणंगले पोलीसांच्यावतीने केलेल्या कारवाईत 50 लोखंडी बॅरेल, 2 सिटेक्स टाक्या, 322 पत्र्याचे जये, 4 अॅल्युमिनीअम डबे, रवरी हौज पाईप इ.अवैध हातभटटी दारू तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा साठा मिळून आला.