पंतप्रधान मोदींची परीक्षा पे चर्चा; मोदींकडून विद्यार्थ्यांना १० मंत्र

Narendra Modi

नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विद्यार्थ्यांशी आज संवाद साधला. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांनाही दिलखुलासपणे उत्तरं दिली. तसेच कोरोनामुळे मिळालेल्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करण्याचं आवाहन केलं. यावेळी त्यांनी पालकांना मुलांवर दबाव न टाकण्याचंही आवाहन केलं. मोदींनी विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरं जाताना महत्त्वाचे मंत्र दिले.

१) एका विद्यार्थीनीने खूप अभ्यास केल्यानंतरही लक्षात राहत नाही. त्यामुळे उत्तरं लक्षात राहावं यासाठी काय करावं? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचं मोदी यांनी मार्मिकपणे उत्तर दिलं. नरेंद्र मोदी म्हणाले, आपल्याला मेमरीची जडीबुटी पाहिजे तर? तुम्ही सर्वात आधी तुमच्या मेमरीतून ही भावनाच डिलीट करुन टाका की, तुम्हाला लक्षात राहत नाही. असा तुम्ही विचारच करु नका. तुम्ही जर स्वत:शी संबंधित काही घटना बघितल्या तर तुम्हाला माहित पडेल की, वास्तवात तुम्हाला अनेक गोष्टी लक्षात राहतात.

जसे की तुमची मातृभाषा. मातृभाषा तुम्हाला कुणी शिकवली होती का? कोणत्याही पुस्तकात याबाबत माहिती नाही. सगळं ऐकूण आपण शिकतो. तुम्हाला जे पसंत आहे ती गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही कधी प्रयत्न केले होते? ज्या गोष्टी तुमच्या आयुष्याच्या अविभाज्य घटक बनतात त्यांचा कधीच विसर पडत नाही. यासाठी इन्टरलाईज करणं जास्त गरजेचं आहे. अभ्यासाला पाठांतर करण्यापेक्षा त्याला अनुभवा. तुमच्याकडे चांगलं सामर्थ्य आहे.

२) तुम्हाला परीक्षेची भीती वाटत नाही, तर वेगळ्या गोष्टीची वाटते. ही परीक्षा म्हणजे तुमचं सर्व काही आहे, आयुष्य आहे असं वातावरण तयार करण्यात आलंय. त्यामुळे आपण अधिक सजग होऊन काळजी करायला लागतो. अधिक विचार करायला लागतो. पण आयुष्यात शेवटची गोष्ट असं काही नाही. आयुष्य खूप मोठं आहे आणि परीक्षा त्यातील एक छोटा टप्पा आहे. कोणताही दबाव घेऊ नका. शिक्षक, पालक आणि कुटुंबीयांनी दबाव निर्माण करु नका.

३) परीक्षेत जे सोपे प्रश्न आहेत ते आधी सोडवा. वेळ शिल्लक राहिला की मग कठीण प्रश्न सोडवा. अभ्यास करताना मात्र कठीण गोष्टींचा आधी अभ्यास करा. तुम्ही फ्रेश आहात तर कठीण गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही कठीण गोष्टींचा सराव कराल तेव्हा सोप्या गोष्टी आणखी सोप्या होतील.

४) जे लोक आयुष्यात यशस्वी होतात ते काही सर्व विषयात निपूण नसतात. ते कोणत्या तरी एकाच विषयात पारंगत असतात. त्यांची एकाच विषयावर चांगली पकड असते.

५) तुम्हाला एखादा विषय अवघड वाटला तरी ती काही तुमच्या आयुष्यातील काही कमतरता नाही. फक्त कठीण विषयापासून पळायचं नाही, अभ्यास करत राहायचा.

६) मुलांच्या पाठी धावावं लागतं

यावेळी त्यांनी पालकांना सांगितलं की मुलांच्या मागे सतत धावावं लागतं. कारणं ते आपल्यापेक्षाही वेगवान असतात. मुलांना काही गोष्टी सांगण्याची, त्यांना काही शिकवण्याची आणि त्यांना संस्कार देण्याची जबाबदारी कुटुंबाची असते. मात्र, कुटुंबातील मोठी व्यक्ती म्हणून बऱ्याचदा आपणही आपलं मूल्यमापन केलं पाहिजे. तुमचा मुलगा परावलंबी होता कामा नये. तो स्वयंप्रकाशित झाला पाहिजे. मुलांमध्ये जी ज्योत तुम्ही पाहात आहात. ती ज्योत त्यांच्या मनात प्रकाशमान झाली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

७) स्वप्नं जरुर पाहावे, पण…

मुलांना स्वप्नात रमणं खूप आवडत असतं. स्वप्न पाहणं ही चांगली गोष्ट आहे. पण स्वप्नांना कुरवाळत बसणं योग्य नाही. स्वप्नांसाठी झोपत राहणंही योग्य नाही. त्याच्याही पुढं गेलं पाहिजे. स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी संकल्प करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, याकडेही त्यांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले. (Exams Are Opportunity To Shape Life, Says PM Narendra Modi)

८) परीक्षा केंद्राबाहेर टेन्शन सोडा

इन्व्हॉल्व, इंटर्नलाईज, असोसिएट आणि व्हिज्यूअलाईज, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हा फॉर्म्युला सर्वात महत्त्वाचा आहे. हा फॉर्म्युल्यामुळे तुमचं मन शांत होईल, असं ते म्हणाले. जेव्हा तुमचं मन सैरभैर असतं. तुमचं चित्त ठिकाण्यावर नसतं, तेव्हा प्रश्न पत्रिका पाहून तुम्ही उत्तरं विसरण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे त्यावर सर्वात चांगला उपाय म्हणजे तुम्ही तुमचं सर्व टेन्शन परीक्षा केंद्राच्या बाहेर सोडूनच परीक्षेला बसा. बघा किती फरक पडतो ते, असं त्यांनी सांगितलं.

९) मुलं स्मार्ट असतात

मुलं खूप स्मार्ट असतात. तुम्ही जे सांगाल ते ही मुलं करतीलच असं नाही. मात्र एक गोष्ट नक्की की तुम्ही जी गोष्ट करत आहात, त्याचं ते अत्यंत बारकाईने निरीक्षण करत असतात आणि तुमचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतात, असंही मोदींनी सांगितलं.

१०) मुलांना घरात तणावमुक्त ठेवा

यावेळी मोदींनी पालकांनाही सल्ला दिला. शिक्षणाच्या बाबतीत मुलांना कधीच ताण देऊ नका. त्यांना घरातून ताण राहिला नाही तर त्यांच्यावर परीक्षेचाही ताण येणार नाही. मुलांना घरात तणावमुक्त ठेवा. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल, असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button