शॉर्ट रन वादात सर्वात अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया प्रीटी झिंटाची

Preity Zinta

दिल्ली कॕपिटल्सने (Delhi Capitals) सुपरओव्हरमध्ये (Super over) किंग्ज इलेव्हन पंजाबवर (Kings XI Punjab) मिळविलेल्या विजयानंतर वादळ उठले आहे. पंजाबच्या फलंदाजांना नाकारलेल्या एका शार्ट रनवरुन गदारोळ सुरू आहे. तिसरे पंच नितीन मेनन यांनी ख्रिस जाॕर्डनने क्रीझच्या आत बॕट टेकवली नसल्याचे कारण देत पंजाबची ही धाव अवैध ठरवली. मात्र टेलिव्हिजन रिप्लेंमध्ये ती धाव वैध होती हे स्पष्ट दिसले. ही धाव पंजाबला मिळाली असती तर सामना ‘टाय’ राहिला नसता आणि नियोजीत वेळेतच पंजाबने जिंकला असता. पण दुर्देवाने ती धाव पंजाबला नाकारली गेली आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेल्यावर कसिगो रबाडाने दिल्लीसाठी विजय खेचून आणला.

या प्रकारानंतर किंग्ज इलेव्हनची मालकीण प्रीटी झींटासह विरेंद्र सेहवाग, स्काॕट स्टायरीस आणि अनेक नामवंतांनी पंचांच्या या निर्णयाने पंजाबचा विजय हिरावल्याची टीका केली आहे, त्यासोबत तंत्रज्ञान उपलब्ध आहे तर त्याची मदत घेऊन तिसऱ्या पंचांनी ती धाव वैध असल्याचे का कळवले नाही असा सवाल केला जात आहे.

यासंदर्भात पंच नितीन मेनन यांचा निर्णय चुकला ही बाब बरोबर आहे मात्र तिसऱ्या पंचांची मदत घ्यायला हवी होती ही अपेक्षा मात्र चुकीची आहे कारण आयपीएल 2020 च्या प्लेइंग कंडिशन्सनुसार शार्ट रनचा निर्णय तिसऱ्या पंचांच्या अधिकार कक्षेत येतच नाही. प्लेईंग कंडिशननुसार फक्त फ्रंट फूट नोबाॕल व धावबाद संदर्भातच तिसऱ्या पंचांना अधिकार आहेत.

प्रिटी झिंटा यांना प्लेइंग कंडिशन्सची ही माहिती आहे म्हणून त्यांनी आपली निराशा व्यक्त केली आहे पण अगदी संतुलितरित्या व नियमांत काय शक्य आहे ते धरुनच प्रतिक्रिया दिली आहे. प्रिटीने म्हटले आहे की, कोविडच्या महामारीतही मी उत्साहाने प्रवास केलाय, स्वतःला सहा दिवस क्वारंटाईन ठेवले आणि हसत हसत पाच वेळा कोविड चाचणी करुन घेतली आहे पण या एका शार्ट रनने मला फार मोठा धक्का पोहचवला आहे. उपयोगात आणणार नसाल तर तंत्रज्ञानाचा काय उपयोग? बीसीसीआयने नवे नियम लागू कराण्याची वेळ आली आहे. असे गोंधळ दरवर्षी होऊन चालणार नाही.

यात लक्षात घ्या प्रीटीने कधीही म्हटलेले नाही की तिसऱ्या पंचाची मदत घ्यायला हवी होती. तिने म्हटलेय नियमात सुधारणा करण्याची गरज आहे. प्रिटीने पुढे म्हटलेय की मी नेहमीच विजय आणि पराभव खेळाडूवृत्तीने आणि शालीनतेने स्विकारले आहेत पण भविष्यात खेळ सर्वांसाठी चांगला व्हावा यासाठी धोरणात बदल करायला हवा. झाले ते झाले, आपल्याला पुढे चालायला हवे पण सुधारणा पण व्हायला हव्यात.

विरेंद्र सेहवागने सर्वात आधी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, या सामन्याच्या सामनाविराच्या निवडीशी मी सहमत नाही. ज्या पंचांनी शाॕर्ट रनचा निर्णय दिला ते खरे सामनावीर आहेत. शाॕर्ट रन नही था. आणि हाच फरक आहे.

माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने म्हटले आहे की, अशा प्रकरणांमध्ये तंत्रज्ञानाची मदत घ्यायला हवी कारण ती धाव शाॕर्ट नव्हतीच. तिसऱ्या पंचाच्या वेळीच हे लक्षात आले असते तर शक्य होते आता या दोन गुणांच्या नुकसानीने पंजाबचा संघ प्ले,आॕफसाठी पात्र ठरु शकला नाही तर…..?

न्यूझीलंडचा क्रिकेटपटू स्कॉट स्टायरिसने म्हटलेय की, शाॕर्ट रनचा निर्णय चुकीचा होता हे ठीक आहे पण शेवटच्या दोन चेंडूत एक धाव काढताच यायला हवी.

किंग्ज इलेव्हनला विजयासाठी 10 चेंडूत 21 धावा हव्या असताना हा प्रसंग घडला. त्यात मयांक अगरवालने कसिगो रबाडाचा याॕर्कर मिड आॕनकडे खेळुन काढल्यावर दोन धावा घेतल्या. त्यावेळी मयांकचा साथीदार ख्रिस जार्डन याने घेतलेली पहिली धाव शाॕर्ट होती असे स्क्वेअर लेग पंच नितीन मेनन यांनी जाहीर केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER