मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या अरेरावीला चाप बसवा, अन्यथा…, ; राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोनामुळे महिलांचं कर्ज माफ करण्याबाबत सरकारनं पावलं उचलावीत ; राज ठाकरेंचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र व इशारा

Raj Thackeray & Uddhav Thackeray

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. कोरोनामुळे महिलांचं कर्ज माफ करण्याबाबत सरकारनं पावलं उचलावीत अशी मागणी राज ठाकरे यांनी पत्रातून मुख्यमंत्री ठाकरेंना केली आहे. मायक्रो फायनान्स कंपन्या विम्याची कागदपत्रं महिलांना देत नाहीत. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या दंडेलशाहीला चाप लावण्याची गरज असून सरकारने यासाठी ठोस पावलं उचलावी असे राज यांनी म्हटले आहे. तसेच, मायक्रो फायनान्स कंपन्यांना चाप लावण्याचे काम सरकार कडून होणार नसेल तर महाराष्ट्र सैनिक त्यांच्या पद्धतीने कारवाई करतील, असा इशारादेखील राज ठाकरेंनी दिला आहे.

काय लिहीले आहे राज ठाकरेंनी पत्रात –

महिला बचत गटांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय करणं आणि त्याचा विस्तार करणं ही नित्याची बाब आहे. कर्ज घेणाऱ्या माता-भगिनींनी कर्जाचा हप्ता चुकवण्यात कधीच दिरंगाई केलेली नाही. प्रसंगी पोटाला चिमटा काढला असेल पण हप्ते वेळेत भरले आहेत. पण, मार्च २०२० पासून कोरोनामुळे केलेलं लॉकडाऊन आणि त्यातून निर्माण झालेलं आर्थिक आरिष्ट ह्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील महिला बचत गटांचे व्यवसाय जवळपास ठप्प आहेत. त्यामुळे अर्थातच मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकले. पण या परिस्थितीचा कसलाही विचार न करता मायक्रो फायनान्स कंपन्यांनी ग्रामीण महाराष्ट्रात दंडेलशाही सुरु केली.

कर्जदाराच्या घरी जाऊन दमदाटी करणे, त्याचा चारचौघांच्यात अपमान करणे असले प्रकार सर्रास सुरु आहेत. या विषयीच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या दंडेलशाहीवर सरकारने अंकुश ठेवायला हवा, कर्जदाराच्या घरी जाऊन त्याची अब्रू चव्हाट्यावर आणण्याचा अधिकार या कंपन्यांना कोणी दिला?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. हा विषय गंभीर आहे आणि हे जर असंच सुरु राहिलं तर याचे मानसिक आणि सामाजिक परिणाम गंभीर असतील हे सरकारने लक्षात ठेवावे. यामुळे सरकार म्हणून आता जागे व्हा आणि पोलीस प्रशासनाच्या मार्फत मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या अरेरावीला चाप बसवा, अशी मागणी राज ठाकरेंनी पत्रातून केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER