महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट? चार पक्षांची मागणी

Maharashtra Today

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Prambir Singh) यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एनआयएच्या अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा उल्लेख परमबीर सिंगांच्या पत्रात आहे. त्यांनी थेट गृहमंत्र्यांवर इतका मोठा आरोप केल्याने महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. अश्यातच आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी (Presidential rule in Maharashtra) होऊ लागली आहे.

या सर्व प्रकरणावर भाजपने आक्रमक भूमिका घेत, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेऊन त्यांची चौकशी करण्याची मागणी उचलून धरली आहे. इतकंच नाही तर दिल्ली भाजपने ठाकरे सरकारवर हल्लाबोल करत, सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपने केली आहे. भाजप खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही आपण राज्यपालांना भेटणार असल्याचं सांगितलं. आमची मागणी आहे राज्यपाल महोदयांनी राज्य सरकार घटनेनुसार चालत नसेल तर त्याची माहिती राष्ट्रपतींना कळवणे गरजेचे आहे. परवा आम्ही राज्यपाल यांना भेटणार आहोत. राज्यपालांनी राज्याची माहिती राष्ट्रपतींना कळवावी, अशी मागणी राज्यपालांकडे करणार आहोत, असं मुनगंटीवार म्हणाले.

भाजप पाठोपाठ अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्रं लिहिलं आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी या पत्रातून केली आहे. नवनीत राणा या अपक्ष खासदार आहेत. मात्र त्यांचे पती रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष आहे. राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारा तिसरा पक्ष म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा आरपीआय पक्ष. “महाराष्ट्रात कायदा सुवस्यवस्था बिघडली असल्याने, राज्यात राष्ट्रपती शासन लावण्याची मागणी मी आज अमित शाह यांच्याकडे करणार आहे. माझ्या मागणीचे पत्र मी देणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप गंभीर आहेत. त्यांनी तातडीने मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. अनिल देशमुखांवर झालेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे”, असं रामदास आठवले म्हणाले.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे आज दुपारी राज्यपालांची भेट घेणार आहेत. या भेटीत हे सरकार बरखास्त करावे अशी मागणी ते करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER