प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाचा अपमान दुर्दैवी : राष्ट्रपती रामनाथ कोविंद

नवी दिल्ली :  आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ( session of Parliament) राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं सुरुवात झाली. नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांनी उल्लेख केला.  नव्या कृषी कायद्यांचा देशातील १० कोटी छोट्या शेतकऱ्यांना थोड्या काळामध्येच लाभ झाला, असं म्हणत दिल्लीत झालेला हिंसाचार दुर्दैवी असल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले. सध्या या कायद्यांच्या अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे.

सरकार सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा सन्मान करून त्याचं पालन करेल. कृषी कायद्यांबद्दल शेतकऱ्यांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सरकार प्रत्येक आंदोलनाचा आदर करते. मात्र, काही दिवसांपूर्वी प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याची घटना दुर्दैवी आहे. जे संविधान आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते तेच संविधान आपल्याला कायदा आणि नियम पाळण्याचं गांभीर्यदेखील शिकवतं, असं रामनाथ कोविंद म्हणाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य कायदा, जीवनावश्यक वस्तू (संशोधन) कायदा, हमीभाव आणि कृषी सेवा कायदा हे नवे कृषी कायदे लागू करण्यात आले असले तरी जुन्या कायद्यांद्वारे सुरू  असलेल्या सुविधा, अधिकार कायम ठेवण्यात येतील, असं सांगितलं.

कृषी कायद्यांद्वारे शेतकऱ्यांना नव्या सुविधा आणि नवे अधिकार देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शेतीला अधिक फायदेशीर बनवण्यासाठी केंद्र सरकार आधुनिक कृषी पायाभूत व्यवस्था निर्माण करण्यावर भर देत आहे. त्यासाठी एक लाख कोटी रुपयांचा अ‌ॅग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड सुरू करण्यात आला आहे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले. देशभरात सुरू करण्यात आलेल्या किसान रेल्वे भारतातील शेतकर्‍यांना नवीन बाजारपेठ उपलब्ध करून देणाऱ्या  आहेत. आतापर्यंत १०० हून अधिक किसान रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. त्याद्वारे ३८ हजार टन धान्य, फळे आणि भाज्या एका प्रदेशातून दुसर्‍या प्रदेशात पाठविण्यात आल्या आहेत, असंही राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER