मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी, शेतीचे नुकसान

Heavy rain.jpg

मुंबई : मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) आणि उपनगरासह राज्यातील अनेक भागांमध्ये मध्य रात्रीपासून पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई आणि ठाण्यातील अनेक भागांमध्ये रात्री उशिरा दमदार पाऊस (Heavy Rain) झाल्यानं हवेत गारवा वाढला आहे तर पहाटेच्या सुमारास पावसाचा जोर ओसरला तरी तुरळ पावसाच्या सरी अधून मधून पडत आहेत. मुंबईसह उपनगरात पावसामुळे गारवा वाढल्यानं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. इतकंच नाही तर पुढच्या 24 तासांत मुंबई, पुण्यासह नागपूर परिसरात हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

मुंबईमध्येही ढगाळ वातावरण झालं असून अनेक उपनगरांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. नवी मुंबईमध्येही रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारी रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली. यामुळे सकाळी कामाला जाणाऱ्यांना कोरोनाच्या संकटात आणखी त्रास सहन करावा लागला. मुंबईतही वसई-विरार नालासोपाऱ्यात सलग तिसऱ्या दिवशी रिमझिम पावसाच्या सरी सुरूच आहे.

आभाळ पूर्णपणे भरलेलं असून हावेत प्रचंड गारवा पसरला आहे. भिवंडीतही पहाटेपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. मंडई बाजार पेठेत सकाळीपासून पाऊस पडत असल्यामुळे सगळीकडे चिखल झाला आहे. खरंतर, या अवकाळी रिमझिम पावसाने साथीचे आजार बाळावण्याची शक्यता वाढली आहे.

पालघर जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली असून आजही सकाळी 7 वाजल्यापासून पालघर शहरात पावसाची रिपरिप सुरूच आहे. काही भागात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे हवेत गारवा पसरला आहे. मात्र, या अवकाळी पावसाचा फटका दुबार पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना बसलेला पाहायला मिळतो.

सलग चौथ्या दिवशी नाशिकमध्ये पावसाची रिपरिप सुरूच आहे. बेमोसमी पावसामुळे हवामानात बद्दल झाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. या अवकाळी पावसामुळे द्राक्ष आणि कांदा पिकांचे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. हवेत प्रचंड गारवा निर्माण झाल्याने थंडीत देखील वाढ झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER