
कोल्हापूर : कोरोना (Corona) प्रतिबंधक लसीकरणासाठी शास्त्रज्ञांनी मान्यता दिल्यानंतर कोल्हापुरात (Kolhapur) कोरोना योद्ध्यांना सर्वप्रथम ही लस (Coronavirus Vaccine) दिली जाणार आहे. त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील १९ हजार कोरोना योद्ध्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या लसीच्या कोल्ड स्टोअरेज क्षमतेचा आढावाही घेण्यात आला आहे. त्यानुसार लसीचे ४१ हजार डोस साठवण्याची क्षमता जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये आहे.
जिल्ह्यामध्ये विविध प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालयांमधून नवजात बालके आणि गर्भवती स्त्रियांना लस दिली जाते. त्यासाठीची जी साठवणक्षमता तयार करण्यात आली आहे, त्याचाच वापर कोरोनाची लस साठविण्यासाठी केला जाणार आहे. बीसीजी, पोलिओ व अन्य लस देण्यापूर्वी ती ज्या कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवली जाते, त्याचाच वापर करून कोरोनाची लस सुरक्षित ठेवली जाणार आहे.
बहुतेक तालुकापातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयात ही लस साठविण्याची क्षमता आहे. त्याचबरोबर नगरपालिका, कोल्हापूर महापालिका व छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटलसह अन्य दवाखान्यात ही लस साठविता येते. त्यासाठी आयएलआर म्हणजेच आईस लाईन्ड रेफ्रिजरेटर, डीप फ्रिजर व कोल्ड स्टोअरेजचा वापर केला जाणार आहे. लसीचे ४१ हजार डोस साठविता येतील अशी त्यांची क्षमता आहे. लस कधी येईल तेव्हा येईल; मात्र त्यासाठीच्या साठवण क्षमतेचा आढावा आरोग्य यंत्रणेकडून घेण्यात आला आहे. जेवढ्या लोकांना लस द्यायची आहे तेवढ्या लोकांना ती देण्याचे नियोजन प्राधान्यक्रम टप्प्यात करण्यात आले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला