नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

कोल्हापूर : नवरात्रोत्सव (Navratri) आता केवळ दोन दिवसांवर आला असून करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील तयारी अंतिम टप्प्यात आली आहे

देवीचे चांदीचे अलंकार आणि पुजेच्या साहित्याची स्वच्छता पूर्ण झाली आहे. आज बुधवारी देवीच्या हिरे, माणिक, पाचू आदी जडावांच्या अलंकारांची स्वच्छता होणार आहे. दरम्यान, यंदा उत्सव भाविकांविना साध्या पध्दतीने होणार असला तरी उत्सवातील मांगल्य आणि उत्साह कायम ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.

अष्टमीदिवशीचे देवीचे चांदीचे वाहन, सिंहासन, कटांजन, पंचारती, एकारती, धूपारती, उत्सवमूर्तीची प्रभावळ, पताका, चोपदार काठी, अब्दागिरी, त्रिशूळ, तलवार आदी साहित्याची स्वच्छता झाली. यावेळी समिती सदस्य राजू जाधव, अंबाबाई मंदिराचे व्यवस्थापक धनाजी जाधव, अभियंता सुदेश देशपांडे, सुयश पाटील, मिलिंद घेवारी आदी उपस्थित होते. दरम्यान, कपीलतीर्थ मार्केट येथील श्री महालक्ष्मी अन्नछत्रही उत्सव काळात बंदच राहणार आहे. मात्र, ट्रस्टच्या वतीने कार्यालयात नऊ दिवस नऊ विविध रूपातील पूजा बांधल्या जाणार आहेत.

चारही गेटवर पोलिस असणार आहेत. उत्सवकाळात भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. मात्र, चारही प्रमुख दरवाजातून दर्शन घेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे उत्सव काळात चारही प्रमुख गेटवर पोलिसांचा बंदोबस्त असेल. येथे भाविकांची अधिक गर्दी होणार नाही, याची खबरदारी देवस्थान समितीतर्फे घेतली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER