मराठा आरक्षण कायदा न्यायालयात टिकला पाहिजे यासाठी तयारी : अशोक चव्हाण

Ashok Chavan - Maratha Reservation

मुंबई :- मराठा आरक्षण कायदा टिकला पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने लागला पाहिजे, यासाठी राज्य सरकारने ज्येष्ठ विधीज्ञ नेमले आहेत. या विधीज्ञांबरोबर चर्चा करून या प्रकरणाच्या सुनावणीबाबत विविध पैलूंनी चर्चा करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले.

येत्या 17 मार्चला होणाऱ्या सुनावणीमध्ये राज्य शासनाची बाजू भक्कमपणे मांडण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण बोलत होते.

आमचे नेमके काय चुकते याचा विचार करावा लागेल : पाथर्डीतील शेतकरी आत्महत्येवर थोरात

मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या मंत्रीमंडळ उपसमितीने आज सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयात बाजू मांडताना कुठल्याही त्रुटी राहता कामा नये, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

शनिवारी सकाळी मुंबईला झालेल्या या बैठकीत समितीचे सदस्य नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी जोंधळे, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, अ‍ॅड. साखरे, अ‍ॅड. विजय थोरात, नवी दिल्ली येथील सरकारी वकील अ‍ॅड. राहुल चिटणीस, अ‍ॅड. अक्षय शिंदे, अ‍ॅड. सजगुरे, विधी व न्याय विभागाचे सहसचिव गुरव यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मराठा समाजातील उमेदवारांना शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. या उमेदवारांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून, त्यांच्या अडचणीवर मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगून चव्हाण यांनी या आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. आझाद मैदानावरील मराठा उमेदवारांच्या आंदोलनाबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात चव्हाण बोलत होते.


Web Title : Preparation for Maratha Reservation Act to be maintained in court – Ashok Chavan

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)