मुख्यमंत्र्यांकडून आज सीमोल्लंघन तर दिवाळीत राजकीय भूकंपाची तयारी पूर्ण – संजय राऊत

Sanjay Raut

मुंबई : शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळाव्याला यंदा अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण या वर्षी फक्त शिवसेना पक्षप्रमुख नाही तर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या (CM Uddhav Thackeray) उपस्थितीत मेळावा पार पडणार आहे, असं मत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केलं. मुख्यमंत्री सीमोल्लंघन करणार आहेत, ते कोणत्या प्रकारचं हे संध्याकाळी समजेल. हिंदुत्व हे आमच्यासाठी लाखमोलाचं आहे. मुख्यमंत्री आज सीमोल्लंघन करणार आहेत. तर दिवाळीत मोठा बॉम्ब फोडणार आहेत. दारूगोळा तयार आहे. केवळ वात पेटवायची बाकी आहे. येत्या दिवाळीत मोठा राजकीय भूकंप होईल. हा भूकंप असा असेल की, विरोधकांकडे काहीही शिल्लक राहणार नाही. असा दावाही त्यांनी केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेळावा घेत आहात, जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा, अशी टीका विरोधकांनी केली आहे. त्याला जोरदार प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी जनाची आणि मनाची बाळगूनच दसरा मेळावा शिवतीर्थावर नाही तर सभागृहात घेत असल्याचं म्हटलंय.

बिहार निवडणूक प्रचारात भाजप ५० हजार लाखांचे मेळावे घेत आहे त्याचं काय? असा सवालही यावेळी संजय राऊत यांनी विचारला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करणार आहेत. कोरोना नसता तर आज शिवतीर्थावर शिवसैनिकांचा महापूर दिसला असता, असं राऊत यांनी आवर्जून सांगितलं. यंदाच्या दसरा मेळाव्याला मोजक्याच लोकांना आमंत्रित करण्यात आल्याचं संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं. यामध्ये पक्षाचे काही पदाधिकारी आणि मुंबईतील शिवसेनेचे आमदार यांचा समावेश असल्याचं राऊत म्हणाले. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर विरोधकांकडून टीका होत आहे.

यावरून संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. बिहार निवडणूक प्रचारात भाजप काय करत आहे? तिथे ५० हजार, लाखाचे मेळावे होत आहेत. तिथे भाजपनं जनाची आणि मनाची लाज बाळगावी. इकडे नागपुरातही सरसंघचालकांनी मेळावा घेतला. सरसंघचालक आम्हाला आदर्श आहेत. पण तिथे विरोधक काय म्हणतील? अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला प्रश्न विचारला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल झाले आहेत. फडणवीस या संकटातून लवकर बाहेर पडावेत यासाठी शिवसेना तुळजाभवानी चरणी प्रार्थना करत असल्याचं राऊत म्हणाले. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयाला फोन करून सूचना दिल्या आहेत. फडणवीस लवकर बरे होऊन बाहेर पडतील यासाठी सरकार काळजी घेत असल्याचंही राऊतांनी आवर्जून सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER