राज्यातील बंद उद्योगांसाठी विशेष अभय योजनेची तयारी – उद्योगमंत्री सुभाष देसाई

Subhash Desai

मुंबई :- राज्यात कोरोना संकटाच्या (Corona Crisis) पार्श्वभूमीवर अनेक उद्योगांना मोठे नुकसान झाले. हे पाहता राज्याच्या उद्योग विभागाने बंद उद्योगांसाठी विशेष अभय योजनेची तयारी केली आहे. सूक्ष्म, लघु, मध्यम वर्गवारीतील उत्पादक घटकांना ही योजना लागू असेल. या योजनेद्वारे बंद पडलेल्या उद्योगांचे पुनरुज्जीवन होऊन रोजगारवाढीला चालना मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी व्यक्त केला.

प्रस्तावित अभय योजनेसंबंधी उद्योगांच्या सूचना समजून घेण्यासाठी आज देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करण्यात आली. विशेष अभय योजनेमध्ये बंद असलेल्या उद्योग घटकांकडे शासकीय देणी थकीत असल्यास त्या रकमेवरील दंड व व्याज पूर्णपणे माफ करून औद्योगिक मालमत्ता नवीन खरेदीदारांकडे हस्तांतरित करण्यासाठी ही योजना साहाय्यभूत ठरेल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला. यापूर्वी २०१६ मधील अशा अभय योजनेचा २८७ उद्योगांनी लाभ घेतला आहे.

प्रस्तावित विशेष अभय योजना उद्योगस्नेही असेल. रोजगार गमावलेल्या कामगारांना या योजनेद्वारे रोजगार उपलब्ध होईल, इतर राज्येदेखील या योजनेचे अनुकरण करतील, असेही देसाई म्हणाले . दरम्यान यावेळी देसाई यांनी विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे, अंबरनाथ, तळोजा, अंबड, सिन्नर आदी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना व औद्योगिक संघटनांना भाग घेऊन काही सूचना केल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button