विधानसभेच्या आडाने संस्थांच्या निवडणुकांची तयारी

कोल्हापूर : गोकुळ, केडीसीसी , बाजार समिती, महापालिका , राजाराम, कुंभी, बिद्री साखर कारखाना, आदी निवडणुकांचा धुरळा २०२०मध्ये उडणार आहे. विधानसभा निवडणुकांनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या संस्थाच्या निवडणुकांत भाजप ताकदीने उतरण्याची तयारी केली आहे. त्यास काँग्रेस-राष्ट्रवादी निकराने लढा देईल. विधानसभा निवडणुकीत दिसलेली समिकरणे बदलून पुन्हा यासंस्थांच्या निवडणुकांत पक्षीय परिघाबाहेरची समिकरणे उदयास येतील, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शांत होईपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात पुढील वर्षभरात डझनभर सहकारी संस्थांच्या निवडणुकींचा धुरळा उडणार आहे.करवीर, कागल, शहर उत्तर आणि दक्षिण आदी मतदारसंघात विधानसभेच्या आडाने पुढच्या निवडणुकांचा पाया घातला जात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते एकत्र आले आहेत. कालपरवापर्यंत संस्थात्मक निवडणुकीच्या निमित्ताने यातील अनेक नेते एकमेकांच्या विरोधात होते. तेच नेते एकमेकाच्या विजयाच्या आणाभाका घेताना दिसत आहेत. आतापर्यंत वेगवेगळ्या व्यासपीठावर असलेली मंडळी आता एकाच व्यासपीठावर दिसत आहेत. मात्र, हीच समिकरणे २०२० मध्ये होणाऱ्या संस्थांच्या निवडणुकीत अशीच राहतील याची खात्री नाही.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गावागावातील गट, नेते आपल्याबाजूने वळविण्यासाठी नेत्यांत स्पर्धा लागली आहे. ही काही पॉकेटस्‌ असणारी माणसे आपल्याबाजूला घेताना विधानसभा निवडणुकीच्या एकगठ्ठा मतांचा विचार केला जात आहे. तरीही या त्या-त्या भागातील ताकदीच्या लोकांना पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांसाठी खास आश्वासने दिली जात आहे.