
पुणे :- राज्य शासनाने 31 डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्कात 3 टक्के सवलत दिली आहे. ही सवलत घेण्यासाठी मुद्रांक कार्यालयात गर्दी होत आहे. यामुळे सर्व्हर डाऊन होत आहे. मात्र प्रत्यक्षात 31 डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्क आदा केल्यास पुढील चार महिन्यात म्हणजे एप्रिलपर्यंत केंव्हाही खरेदी दस्त नोंदणी करता येईल, यासाठी जादा पैसे द्यावे लागणार नाहीत, असे आदेश याबाबतचे आदेश नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक ओमप्रकाश देशमुख (Omprakash Deshmukh) यांनी काढले आहेत.
कोरोना (Corona) महामारीमुळे राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात कपात केली आहे. ही मुदत 31 डिसेंबरपर्यंत होणाऱ्या खरेदी खतावर आहे. त्यामुळे खरेदी खतांवरील मुद्रांक शुल्काची सवलत घेण्यासाठी गर्दी होत आहे. सवलतीचा फायदा सर्वसमान्यांना व्हावा, यासाठी काही दुय्यम निबंधक कार्यालयांची वेळ सकाळी साडेसात ते दुपारी सव्वातीन आणि दुपारी एक ते रात्री साडेआठपर्यंत सुरू ठेवले जात आहे.
गरज भासल्यास शनिवार आणि रविवारी सुट्टीच्या दिवशीही कार्यालये सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दस्त निष्पादनाच्या तारखेस शुल्क आदा केल्यावर दस्तऐवज नोंदणी अधिनियमातील तरतुदीनुसार दस्त निष्पादनापासून चार महिन्यांपर्यंत केंव्हाही दस्त नोंदणीस दाखल करता येतात. त्यामुळे ग्राहकांनी केवळ मुद्रांक शुल्क आदा करून सवलत घेतली तरीही चालते. मुद्रांक शुल्क 31 डिसेंबरपूर्वी आदा करून पुढील चार महिन्यात म्हणजे एप्रिल पर्यंत ग्राहक केंव्हाही दस्तनोंदणी करू शकतात.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला