महाराष्ट्रात अजून काही दिवस पडणार अकाळी पाऊस

Heavy Rain

पुणे : राज्यात अजून काही दिवस अकाळी पावसाची स्थिती राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. येत्या २४ तासांत कोकणासह गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. राज्यात तुरळक ठिकाणी गारपीटही होण्याचा अंदाज आहे. नागरिकांना घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

सध्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीपासून विदर्भापर्यंत हवेची द्रोणीय व उत्तर कर्नाटकपासून विदर्भापर्यंत वाऱ्याची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. यामुळे राज्यात काही ठिकाणी अकाळी पावसाचे ढग दाटले आहेत. ही स्थिती पुढील आणखी पाच दिवस अशीच राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे पुढील पाच दिवसांत मध्य महाराष्ट्र, गोवा, कोकण, विदर्भ आणि मराठवाडा या परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे, असे पुणे हवामान वेधशाळेने म्हटले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात बऱ्याच ठिकाणी सतत पाऊस सुरू आहे.

कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यांत पावसासोबतच आणि गारपीटही झाली आहे. आज पुणे, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांत ताशी ३० – ४० कि. मी. वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांत पुढील तीन तासांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने नुकत्याच जारी केलेल्या सॅटेलाइट इमेजनुसार, राज्यात मध्य महाराष्ट्रासह दक्षिण मराठवाड्यात अकाळी पावसाचे ढग घोंघावत आहेत. त्यामुळे पुढील तीन ते चार तासांत मध्य महाराष्ट्रासह दक्षिण मराठवाड्यात मेघगर्जनेसह जोरदार वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button