अकाली केस पांढरे होणे – कारणं आपल्या आहारविहारातच !

diet for healthy hair

आजकाल केस लवकर पांढरे होण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अगदी लहान मुलांमधेसुद्धा केस पांढरा डोकावयाला लागला आहे. अकाली पांढर्‍या केसांना काळे करण्याकरीता मोठे कॉस्मेटिक उत्पादनाचं दालनच आपल्याला बघायला मिळते. तरुण मुलं मुली पांढरे केस काळे करण्याकरीता या रसायनयुक्त उत्पादनांचा सर्रास उपयोग करतांना दिसतात. कलर डाय विविध पॅक याकरीता उपलब्ध आहेत. मूळापासून केस पुन्हा काळे होतील याची शाश्वती मात्र कुणीच देत नाही. केसांचे आरोग्य चांगल राहीलच याची देखील शक्यता नसते. आयुर्वेद मात्र व्याधी कोणताही असो त्याची कारणं शोधून त्या कारणांचा त्याग व त्या कारणानुसार चिकित्सा यावर भर देतो.

अकाली केस पांढरे कशामुळे होऊ शकतात ?

आहारात मीठाचे प्रमाण जास्त असणे – मीठ (सहसा सैंधवच) आहारात कमी प्रमाणातच असावे. पापड लोणचं, वरून अधिक मीठ घेण्याची सवय याव्दारे जास्तीचे मीठ खाल्ल्या जाते. जे केसांना अकाली पांढरे करतात. अतिचिंता, काळजी, क्रोध – या मानसिक आवेगांमुळे शरीरातील दोष साम्यता बिघडून पित्त वाढून केस पांढरे होतात. पित्त वाढविणार्‍या रसांचे, आहाराचे सतत सेवन – आंबट, तिखट आणि लवण हे तीन रस पित्तवर्धन करणारे असतात त्यामुळे हे अधिक प्रमाणात घेणे पित्त वाढवून केसांचे आरोग्य बिघडवितात व केस पांढरे होतात. उन्हात जास्त वेळ उघड्या डोक्याने काम करणे.

आहारात तूप दूध अशा स्निग्ध पदार्थांचा समावेश नसणे – केस हा अस्थिधातूचा उपधातु आहे त्यामुळे याचे शरीरात योग्य पोषण होण्याकरीता आहारात तूप दूध अश्या स्निग्ध द्रव्यांचा समावेश आवश्यक आहे. शरीराला आतून बाहेरून स्निग्ध ठेवल्याने कोणताच अवयव रुक्ष होत नाही वात वृद्धी होत नाही. धातूचे पोषण आहारानेच होऊ शकते. धातुचे पोषण जेवढे चांगले त्याचे कार्य चांगले होत राहील. केसांना जर पोषणच मिळाले नाही तर केस गळणे पिकणे हे हमखास बघायला मिळेल. केसांना तेल लावणे हा देखील केसांच्या मूळांना बळकट स्वस्थ करण्याकरीता आवश्यक आहे.

अनुवांशिक इतिहास – हे देखील कारण अकाली केस पिकण्याचे असू शकते. याशिवाय आजकाल हेअर कलरचा उपयोग, जड पाणी, केसांवर विविध प्रयोग, डोक्याची केसांची उष्णता वाढविणारे यंत्र ( कर्लिंग, ड्रायर इ.) गरम पाणी डोक्यावरून घेणे; ही सुद्धा कारणे आढळतात. आपण बऱ्याचदा म्हणतो ‘ डोकं थंड ठेव’ डोकं शांत असणे, पित्त न वाढणे केसांच्या आरोग्याकरीता आवश्यक. म्हणूनच केस का पांढरे होतायत हे शोधणे व त्याचा त्याग करणे ही चिकित्सेची सुरवात गरजेची ठरते.

Vaidya Sharwari Sandeep Mishal

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER